Arvind Kejriwal on Sunny Deol : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाब येथे अभिनेता सनी देओलच्या मतदारसंघात जाऊन त्याचा खरपोस समाचार घेतला. केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओलवर देखील निशाणा साधला. सनी देओल त्याच्या लोकसभा मतदारसंघात येतही नसल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये बोलत होते.
अरविंद केजरीवाल यांनी जनतेला संबोधताना म्हटले, "मागील लोकसभा निवडणुकीत तुम्ही लोकांनी सनी देओलला निवडून पाठवले होते. पण तो कधी आला, कधी त्याचा चेहरा पाहिला का? कधीच आला नाही. तो एक चांगला अभिनेता आहे असे आपल्याला वाटायचे. तो चांगले काम करेल, त्यामुळे मत दिले. पण ही मोठी लोक काहीच करणार नाहीत." गुरुदासपूरमध्ये १८५४ कोटी रुपयांच्या विकास योजनांचा शुभारंभ करताना केजरीवाल विरोधकांवर बरसले.
सनी देओलवर टीकास्त्र "सामान्य लोकांना मतदान करा, ते तुमच्यासाठी काम करतील. जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा तुमचा फोन उचलला जाईल. घरी जेव्हा गरज असेल तेव्हा घरीही येतील. दुसऱ्या पक्षाच्या फंदात पडू नका. मागील दीड वर्षात आम्ही जे काम केले आहे, त्याच्या आधारावर मतदान करा. सनी देओलने ज्या प्रकारे धोका दिला आहे, यावेळी मात्र अशी फसवणूक करून घेऊ नका", अशा शब्दांत त्यांनी देओलवर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, 'विकास क्रांती रॅली'मध्ये बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, गुरुदासपूरमध्ये चांगल्या दर्जाच्या सरकारी शाळा बांधल्या जात आहेत. आम्ही राजकारणात पैसा कमावण्यासाठी किंवा सत्ता भोगण्यासाठी आलो नाही, जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत. पूर्वीचे सरकार म्हणायचे की तिजोरी रिकामी आहे. गुरुदासपूर ही वीरांची भूमी आहे. शहीदांच्या कुटुंबीयांना आम्ही आर्थिक मदत म्हणून एक कोटी रुपये देतो.