आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी हरयाणातील जींद दौऱ्यावर होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते मोर्चेबांधणी करत आहेत. त्यांनी जींद येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. केजरीवाल यांनी यावेळी इतर विरोधी पक्षांसह भाजपवर निशाणा साधला. याशिवाय सरकारने माझ्या पाच मागण्या मान्य केल्यास राजकारण सोडेन असे आव्हान दिले. केजरीवाल यांच्या पाच मागण्यांमध्ये चांगले शिक्षण, उपचार, कमी महागाई, रोजगार आणि गरिबांना मोफत वीज यांचा समावेश आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह पंजाबचे मुख्यमंत्री देखील मंचावर उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, माझ्या पाच मागण्या आहेत, या केवळ माझ्याच नाहीत तर १४० कोटी देशवासियांच्या मागण्या आहेत. माझ्या पाच मागण्या पूर्ण करा, मी राजकारण सोडेन. मी इथे सत्तेसाठी आलो नाही, मी मंत्री किंवा मुख्यमंत्री बनण्यासाठी आलो नाही आणि पैसा कमावण्यासाठीही आलो नाही. मी १४० कोटी जनतेच्या वतीने जिंदच्या व्यासपीठावरून ही मागणी करत आहे.
केजरीवाल यांच्या पाच प्रमुख मागण्या
- देशातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करा, सर्वांना समान शिक्षण द्या.
- प्रत्येक नागरिकासाठी चांगल्या उपचाराची व्यवस्था करा.
- महागाई कमी करा, आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये हे करून दाखवले आहे.
- प्रत्येक हाताला, तरूणाराला रोजगार उपलब्ध करून द्या.
- गरिबांना मोफत वीज द्या, सर्वांना २४ तास वीज द्या.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ईडी-सीबीआय आणि दिल्ली पोलीस माझ्या मागे लागले आहेत जणू काय मी दहशतवादी आहे. मी दहशतवादी नाही, हे दहशतवादी आहेत ज्यांनी प्रत्येक घरात महागाईची दहशत पसरवली आहे. आज उपचार घेणे किती महाग झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल महागले कारण तेल कंपन्या त्यांचे मित्र चालवत आहेत. आज वीज महाग आहे कारण ती वीज कंपन्यांच्या आदेशानुसार आहे.