“...अन्यथा काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू, ऐक्याला सुरुंग लागतोय”; आप आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:42 IST2024-12-27T14:41:00+5:302024-12-27T14:42:50+5:30
Delhi Assembly Election: काँग्रेसच्या उमेदवारांचा निवडणूक खर्च भाजपाकडून होत असल्याचा मोठा दावा आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.

“...अन्यथा काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू, ऐक्याला सुरुंग लागतोय”; आप आक्रमक
Delhi Assembly Election: आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाचे नेते काँग्रेस आणि भाजपावर टीका करताना दिसत आहेत. यातच आता काँग्रेसमुळेइंडिया आघाडीच्या ऐक्याला सुरुंग लागत असून, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने भाजपाशी हातमिळवणी केल्याचा आरोप आप पक्षाने केला आहे.
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी काँग्रेस आणि भाजपावर निशाणा साधला आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला फायदा व्हावा यासाठी काँग्रेस त्यांना मदत करत आहे. अजय माकन भाजपाची स्क्रिप्ट वाचत असतात, ते भाजपाच्या इशाऱ्यावर विधाने करतात आणि भाजपाच्या सूचनेनुसार आप नेत्यांना लक्ष्य करतात. काल त्यांनी सर्व मर्यादा ओलांडत आमचे नेते अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटले, अशी टीका संजय सिंह यानी केली.
...अन्यथा काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू
त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अजय माकन यांच्यावर काँग्रेसने २४ तासांच्या आत कारवाई करावी अन्यथा आम्ही इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी संपर्क साधू आणि काँग्रेसला आघाडीतून काढून टाकण्याची मागणी करू, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेस अरविंद केजरीवाल यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप करत आहे. काँग्रेसने माझ्या आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसने भाजपाच्या कोणत्याही नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे का? काँग्रेसच्या उमेदवारांचा निवडणूक खर्च भाजपाकडून होत असल्याचे आम्हाला सूत्रांकडून समजले आहे. भाजपा काँग्रेसच्या उमेदवारांना निधी देत आहे, असा मोठा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे.
दरम्यान, फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. सलग १५ वर्षे दिल्लीत सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ६२ जागा तर भाजपाने ८ जागा जिंकल्या होत्या.