AAP Vs BJP: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात केंद्र सरकार एक अध्यादेश आणत आहे. या अध्यादेशाला आम आदमी पक्षाने कडाडून विरोध केला असून, देशभरातील विरोधी पक्षांना या विधेयकाविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले. या विधेयकावर बोलताना अमित शाह यांनी आम आदमी पक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. याला आम आदमी पक्षाने प्रत्युत्तर दिले.
अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात केंद्र सरकार नॅशनल कॅपिटल सिव्हील सर्विसेस ॲथॉरिटीचे गठन करणार आहे. या अधिकार समितीत दिल्लीचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि प्रधान गृह सचिव असतील. ही अधिकार समिती पोस्टिंग, बदल्यासंदर्भात शिफारस करून उपराज्यपालांकडे पाठवेल. त्यावर उपराज्यपाल निर्णय घेतील. अध्यादेशावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत भूमिका मांडली. यावर आम आदमी पक्षाने प्रत्युत्तर दिले.
INDIA मुळे भाजपचा पराभव
अमित शाह दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला 'वर्ल्ड क्लास' बनवले आहे. जागतिक स्तरावर नेले आहे. भाजपला 'इंडिया' नावाची भीती वाटते आणि २०२४ मध्ये पक्षाचा पराभव होईल. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले अमित शाह हे केजरीवाल सरकारचे ध्येय सेवा नसल्याचे सांगत आहेत, असा पलटवार आम आदमी पक्षाचे खासदार सुशील गुप्ता यांनी केला.
नेमके काय म्हणाले अमित शाह?
पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनीही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यास विरोध केला होता. दिल्लीबाबत कायदे करण्याचा पूर्ण अधिकार केंद्राला आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांना सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या मनाला जे पटते, तेच वाचले आहे. तुम्ही सर्व बाबी निःपक्षपातीपणे सभागृहासमोर ठेवाव्यात. सन २०१५ मध्ये असा पक्ष दिल्लीत सत्तेवर आला, ज्याचे उद्दिष्ट फक्त लढणे होते, सेवा करणे नाही. त्यांची अडचण ट्रान्सफर पोस्टिंगचे अधिकार मिळण्याची नाही, तर आपले बंगले बांधण्यासारखा भ्रष्टाचार लपविण्यासाठी आणि दक्षता विभागाला आपल्या बाजूने करण्याची आहे. मी सर्व पक्षांना विनंती करतो की, निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याचे राजकारण करू नये. देशाच्या भल्यासाठी विधेयके आणि कायदे आणले जातात, त्यामुळे दिल्लीच्या भल्यासाठी विरोध करणे योग्य नाही, असे अमित शाह यांनी स्पष्टपणे नमूद केले.