Delhi Exit Polls: दिल्ली विधानसभेच्या ७० जागांवर आज संध्याकाळी मतदान संपल्यानंतर विविध एक्झिट पोल समोर आले आहे. बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दिल्ली विधानसभेच्या ७० जागांवर ५७.७० टक्के मतदान झालं. दिल्ली निवडणुकीचे ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. भाजपला ११ पैकी नऊ एक्झिट पोलमध्ये बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे. तर दोन एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्ष सत्तेत येणार असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलनुसार २७ वर्षांनंतर भाजप दिल्लीत सत्तेत परतण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मात्र आपने एक्झिट पोलचे निकाल नाकारले आहेत.
दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांवर मतदान झाल्यानंतर विविध यंत्रणांच्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असे म्हटलं आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. मात्र आम आदमी पक्षाने बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे आकडे नाकारले आहेत. सर्वेक्षण करणाऱ्यांनी आमच्या कामगिरीला कमी लेखले आहे, असं आपने म्हटलं आहे. दुसरीकडे भाजपने या एक्झिट पोलचे वर्णन लोकांच्या परिवर्तनाच्या आकांक्षेचे प्रतीक असल्याचे केले आहे.
दिल्ली सरकारचे मंत्री आणि ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांनी एक्झिट पोलच्या आकड्यांवर भाष्य केलं. "आम्ही दिल्लीची ही चौथी निवडणूक लढवली आहे. २०१३ आणि २०१५ च्या एक्झिट पोलमध्ये आमचा पराभव दाखवला होता. २०२० मध्येही आमच्या जागा कमी दाखवल्या गेल्या होत्या आणि २०२५ च्या एक्झिट पोलमध्येही आमच्या जागा कमी दाखवल्या जात आहेत. त्यामुळे आप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार असून हे सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील," असं सौरभ भारद्वाज म्हणाले.
आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या रीना गुप्ता यांनी एक्झिट पोलवर प्रतिक्रिया दिली. एक्झिट पोलमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला नेहमीच कमी लेखण्यात आले आहे. पण निकालांमध्ये पक्षाच्या या अंदाजापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहेत. तुम्ही कोणतेही एक्झिट पोल बघितले तर आपला नेहमीच कमी जागा मिळाल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष निकालात जास्त जागा मिळाल्या, असं रीना गुप्ता म्हणाल्या.