नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी यासंदर्भात त्यांनी घोषणा केली. उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत.
जनआंदोलनच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षांपूर्वी पार्टीची स्थापना करण्यात आली होती. तीन वेळा दिल्लीत सरकार स्थापन करण्यास पार्टीला यश मिळाले. याशिवाय, पंजाबमध्ये आपल्या पार्टीने मुख्य विरोधी पक्षाचीही भूमिका बजावली आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये अनेक पक्षांचे सरकार आले आणि सर्वांनी आपले घर भरण्याचे काम केले. यातच, उत्तर प्रदेशातून बरेच लोक आले, त्यांनी असे सांगितले की, आम आदमी पार्टीने राज्यात विधानसभा निवडणुका लढवाव्यात, असे अरविंद केजरीवाल म्हणाले, तसेच, उत्तर प्रदेशातील लोकांना प्रत्येक कामासाठी दिल्लीत का यावं लागलं? कानपूरच्या मुलांना चांगल्या कॉलेजसाठी दिल्लीत का यावं लागलं? भारतातील सर्वात मोठे राज्य सर्वात मोठे विकसित राज्य का होऊ शकले नाही? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
महिलांवरील अत्याचार थांबत का नाहीत?उत्तर प्रदेशात सर्व पक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. अशा परिस्थितीत तेथील जनता आता आम आदमी पार्टीवर विश्वास ठेवेल. उत्तर प्रदेशात मोहल्ला क्लिनिक का तयार होत नाही? आपण चांगली कॉलेज का तयार करू शकत नाही? असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, भाजपावर निशाना साधत महिलांवर होणारे अत्याचार अखेर का थांबत नाहीत? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.
तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यास यशआम आदमी पार्टीने दिल्ली शिवाय पंजाब, गोवा आणि हरयाणा विधानसभेच्या काही जागांवर निवडणूक लढविली आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार आहे, तर पंजाबमध्येही पार्टीला चांगले यश मिळाले आहे. चांगले शिक्षण, आरोग्य आणि मोफत वीज-पाण्याच्या फॉर्म्युल्यामुळे 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 70 पैकी 62 जागा जिंकून दिल्लीत तिसर्यांदा सरकार स्थापन करण्यात यश मिळविले.