- सुरेश भुसारी नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविण्याची आपची जय्यत तयारी ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. यापूर्वी पंजाब, गोवा व गुजरातमध्ये आपच्या उमेदवारांनी काँग्रेसला चांगलेच नुकसान पोहोचविले आहे.
आपने कर्नाटकमध्ये पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. पंजाब, गोवा व गुजरात या राज्यांच्या निवडणुकांमध्ये आपने काँग्रेसच्या मतांवर डल्ला मारला आहे. गुजरातमध्ये १२.९२ टक्के मते घेऊन आपचे ५ आमदार विधानसभेत पोहोचले आहेत. आप काँग्रेसच्या मतांवर डल्ला मारत आहे. यामुळे आपचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरी मतदारांवर नजर?
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या आपने आता कर्नाटकमध्ये मोर्चा उघडला आहे. कर्नाटकच्या २२४ जागांपैकी बहुतेक जागांवर उमेदवार उतरविण्याचा आपचा प्रयत्न आहे. आपने शुक्रवारी ६० जणांची यादी जाहीर केली. त्यात वरुणा मतदारसंघातून काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या विरोधात राजेश जीएस यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कर्नाटकमध्ये जात असून कर्नाटकमधील शहरी मतदारांवर आपची नजर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजप आमदार काँग्रेसमध्ये?
भाजप आमदार गोपाळकृष्ण यांनी निवडणुकीपूर्वीच राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिल्याने भाजपमध्ये खळबळ माजली आहे. जनता दलाच्याही आणखीन दोन विद्यमान आमदारांनी पक्षाचा तसेच आमदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेशाचे संकेत दिले.तुमकूर जिल्ह्यातील गुब्बी विधानसभा मतदारसंघातील आमदार एस. आर. श्रीनिवास यांनी बुधवारी राजीनामा देऊन गुरुवारी कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. श्रीनिवास सलग चारवेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. दरम्यान, हसन जिल्ह्यातील आर्कलगुडचे जनता दलाचे आमदार ए. टी. रामास्वामी यांनी पक्षाचा तसेच आमदारपदाचा राजीनामा दिला आहे.