ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - दिल्लीची सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने फक्त ११ महिन्यात प्रसिध्दीवर ६० कोटी रुपये खर्च केले आहेत. सरकारच्या विविध खात्यांनी कामांच्या प्रसिध्दीसाठी प्रिंट, टीव्ही, रेडिओ आणि अन्य प्रकारच्या जाहीरातींवर इतका खर्च केला आहे.
दिल्लीच्या माहिती आणि प्रसिध्दी संचलनालयाने जाहीरात खर्चापोटी २५ कोटी रुपये दिले आहेत. आता हा भार आणखी ३५ कोटी रुपयांनी वाढणार आहे. सम-विषम फॉर्म्युल्याच्या प्रसिध्दीसाठी फक्त दोन कोटी रुपये खर्च आला आहे. दिल्ली सरकारने जाहीरात आणि प्रसिध्दीच्या खर्चासाठी ५२६ कोटींची तरतूद केली आहे.
इतर सरकारांकडे हिशोब मागणा-या, त्यांच्या पैसे उधळण्यावर टीका करणा-या केजरीवालांवर या तरतुदीसाठी जोरदार टीका झाली होती. अकरा महिन्याच्या कार्यकाळात दिल्ली सरकारने आठ ते नऊ जाहीरात कॅम्पेन केले. या सर्व जाहीरात कॅम्पेन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याभोवती केंद्रीत होत्या.