नवी दिल्ली, दि. 28- दिल्लीतील बवाना विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे. ‘आप’चे उमेदवार रामचंदर यांचा विजय झाला आहे. आम आदमी पक्षाने तब्बल 24 हजार मतांनी विजयाला गवसणी घातली असून, दुसऱ्या क्रमांकावर भाजपा तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. या निवडणुकीत भाजपाकडून वेदप्रकाश, आम आदमी पक्षाकडून रामचंद्र आणि काँग्रेसकडून सुरेंद्र कुमार निवडणुकीच्या रिंगणात होते.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीकारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचं चित्र आता पाहायला मिळतं आहे.
दिल्लीतील बवाना येथे आप, भाजप आणि काँग्रेस या पक्षांमध्ये लढत होती. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर ‘आप’साठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. ‘आप’चे रामचंदर हे २४ हजार मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत राम चंदर यांना ५९ हजार ८८६ मतं मिळाली. तर भाजपच्या वेद प्रकाश यांना ३५ हजार ८३४ आणि काँग्रेसच्या सुरेंदर कुमार यांना ३१हजार ९१९ मतं मिळाली.भाजपाचे उमेदवार वेदप्रकाश हे बवाना मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे आमदार होते. पण, त्यांनी ‘आप’ला राम राम करत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे बवानामध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. दिल्ली महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर बवाना पोटनिवडणूक म्हणजे आम आदमी पक्षाची एकप्रकारे परीक्षाच होती. तर काँग्रेससाठीही जागा मिळविण्याची पुन्हा एकदा संधी होती. त्यात राजौरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर भाजपाने बावनामध्ये कंबर कसली होती. पण, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने बवानामध्ये बाजी मारली आहे.
बवाना मतदारसंघात सुरूवातीली होती काँटेंकी टक्करदिल्लीच्या बवाना पोटनिवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान सुरूवातीला काँटेंकी टक्कर पाहायला मिळाली. मतमोजणी दरम्यान काँग्रेस सगळ्यात पुढे, भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आणि आम आदमी पार्टी तिसऱ्या क्रमांकावर होती. मतमोजणीच्या काही वेळानंतर चित्र पूर्ण बदलायला लागलं होतं. आपचे उमेदवार रामचंद्र यांनी हळूहळू आघाडी घेऊन इतर प्रतिस्पर्धींना मागे टाकलं. सुरुवातील पहिल्या क्रमांकावर असणार काँग्रेस पक्ष पूर्णपणे पिछाडीवर जाऊन थेट तिसऱ्या क्रमांकावर गेला. आपच्या उमेदवाराला 24 हजार 052 मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. बवानामध्ये 23 ऑगस्ट रोजी पोटनिवडणुकीचं मतदान पार पडलं होतं. मतदानाच्या दिवशी एकुण 45 टक्के मतदान झालं.