दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मध्य प्रदेशात निवडणुकीचा शंखनाद केला आहे. 'आप'ला पर्याय म्हणून समोर ठेवत केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला एक संधी देण्याचे आवाहन केले. सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांच्या अटकेवरून केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्ला चढवला. 'ज्या दिवशी मनीष सिसोदिया यांना अटक झाली, त्याच दिवशी देशाचा पंतप्रधान शिक्षित असावा, असे वाटले. पंतप्रधान कमी शिक्षित असल्यास कुणीही मूर्ख बनवू शकते, असे अरविंद केजरीवाल म्हणाले, ते राजधानी भोपाळमध्ये मंगळवारी आयोजित कार्यकर्ता सम्मेलनाला बोलत होते.
केजरीवाल म्हणाले, "पंतप्रधानांनी मनीष सिसोदिया यांना जेलमध्ये पाठवले. त्याच दिवशी मला वाटले की, देशाचा पंतप्रधान शिक्षित असायला हवा. देशाचे पंतप्रधान शिक्षित असते तर त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळले असते. देशाचे पंतप्रधान देशभक्त असते, तर सोसोदिया हे आम आदमी पक्षाचे आहेत की, इतर कुठल्या पक्षाचे, असा विचार त्यांनी केला नसता. त्यांनी मनीष सिसोदिया सारख्या व्यक्तीला देशाचे शिक्षण मंत्री बनवले असते आणि देशातील 10 लाख शाळा व्यवस्थित करायला सांगितले असते. पण त्यांनी सिसोदिया यांना तुरुंगात टाकले."
'आप' संयोजक केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवताना अतिशय बोचऱ्या शब्दांचा वापर केला. केजरीवाल म्हणाले, 'कमी शिकलेला पंतप्रधान असेल तर कुणीही मूर्ख बनवेल. कुणीतरी येऊन म्हणेल, साहेब, नोटाबंदी करा, भ्रष्टाचार संपेल. आता कमी शिकलेला पंतप्रधान असेल तर, त्यांना समज नाही, नोटाबंदी केली, भ्रष्टाचार संपला? कुणी येऊन म्हणेल की नोटाबंदीने दहशतवाद संपुष्टात येईल, काय झाले? संपूर्ण देश रांगेत उभा राहिला. संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला. ना भ्रष्टाचार संपला ना दहशतवाद. कुणी म्हणेल सर्वांना थाळी वाजवायला सांगा, कोरोना संपुष्टात येईल. संपूर्ण देशाला थाळी वाजवायला सांगितले. म्हणूनच मी म्हणतो की देशाचा पंतप्रधान शिक्षित असायला हवा.'