नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्यांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सर्व स्तरातून टीका केली जात आहे. ''भारतीय लष्कराला सैन्य उभारणीसाठी अनेक महिने लागतात. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ आल्यास अवघ्या तीन दिवसांमध्ये स्वत:चे लष्कर उभे करू शकते'', असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मोहन भागवत यांच्या विधानावर विरोधी पक्षातील नेत्यांनी तीव्र शब्दांत टीका नोंदवली आहे.
आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी ट्विटरवर "हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते है तो चर्चा नही होती" अशा शब्दात मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे. 'जर हेच विधान दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याने केले असते तर भाजपानं त्याला आतापर्यंत पाकिस्तानात धाडले असते. मीडियाने तर फाशीच्या शिक्षेची मागणी केली असती. पण आता गोष्ट भागवतांची आहे.' असंही ते म्हणालेत.
देशातील आपत्तीच्यावेळी संघ स्वयंसेवक नेहमीच तत्पर असतात, असं सांगतानाच 'भारत-चीन युद्धाच्यावेळी स्वयंसेवक सीमेवर पाय रोवून उभे राहिले. स्वयंसेवकांनी चीनच्या सैनिकांचा मुकाबला केला. स्वयंसेवकांनी जर मनात आणलं तर आताही चीनच्या सैनिकांना भारतात घुसखोरी करणं कठीण होईल,' असेही यावेळी भागवत यांनी सांगितले.
भागवत यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. भागवत यांचं हे वक्तव्य लष्कराचे खच्चीकरण करणारे असून हा लष्कराचा अपमान आहे. त्याबद्दल भागवत यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे राज्य प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी केली आहे.