नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वर्ष २०२२ च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील ७ पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. या परीक्षेत देशभरातील एकूण ९३३ उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यापैकी राज्यातील ७०हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच झेंडा उंच फडकला आहे. या परीक्षेत यंदाही अनेकांनी हालाकीच्या परिस्थितीतून हे यश संपादन केले. तर, अनेकांनी जिद्दीने बाळगलेले स्वप्न पूर्ण केले. विशेष म्हणजे यंदा युपीएससी परीक्षेत आमीर खान आणि अनुष्का शर्मा यांनाही यश मिळाले आहे.
यूपीएससी परीक्षेत ईशिता किशोरने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. ईशिताने सांगितले की, ती परीक्षेच्या तयारीसाठी दिवसातून किमान आठ-नऊ तास घरामध्येच अभ्यास करायची. हे यश माझ्या मेहनतीचे फळ आहे. तर, देशात पहिल्या ४ क्रमांकात मुलींनीच बाजी मारली आहे. ठाण्याच्या कश्मिरा संखेने राज्यात पहिल्या क्रमांकाचा मान मिळवला, ती देशात २५ वी रँक घेऊन झळकली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या युपीएससी परीक्षेत आमीर खान आणि अनुष्का शर्मालाही यश मिळाले आहे. दे दोन्ही उमेदवार म्हणजे सिनेक्षेत्रातील अभिनेता किंवा अभिनेत्री नसून रिअल लाईफमध्ये हिरो बनले आहेत.
बांदा येथील रहिवाशी आमीर खानने युपीएससी परीक्षेत यश मिळवले असून त्याने देशात १५४ वी रँक मिळवली आहे. तर इंदौरच्या अनुष्का शर्माने २० रँक मिळवत हे यश पटकावले आहे. अनुष्काने युपीएससी परीक्षेत देशात २० वी रँक मिळवत कुटुंबाचा आणि इंदौरचा मान वाढवला आहे. अनुष्का मूळ राजस्थानची कन्या असून सध्या कुटुंबासमवेतच इंदौर येथे राहत आहे. तिने द सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथून पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला, तिसऱ्या प्रयत्नात तिने हे यश मिळवलं.
युपीच्या बांदा येथे एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाच्या मुलाने, आमीर खानने परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवलं. आमीरच्या या यशाबद्दल कुटुंबीयांसह नातेवाईकांना अत्यानंद झाला आहे. आमीरचे वडिल रफाकत हुसैन यांनी मुलांच्या शिक्षणासाठी २० वर्षांपूर्वीच आपलं गाव सोडलं होतं. त्यांना ३ मुले आणि ४ मुली असून मोठा मुलगा आमीर खान याने युपीएससी परीक्षेत १५४ वी रँक मिळाल्याने सर्वांना आनंद झाला आहे.