मुंबई - अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहे. आर्यनच्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. मात्र, आमीर खानने अद्याप काहीही मत मांडलं नसल्याने आमीर खानच्या नावाची चर्चा रंगली होती. आता, वेगळ्याच कारणाने आमीरचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. आमीरने लोकांना रस्त्यावर फटाके न वाजविण्याचा सल्ला दिल्याने अनेकांना त्याला ट्रोल केलं आहे. टायर कंपनीच्या जाहिरातीमधून आमीर हा सल्ला देत आहे.
भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी आमीरच्या या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. कंपनीने नमाजच्या नावाखाली रस्ते बंद करणे आणि अजानच्या वेळी मस्जीदमधून बाहेर पडणारा आवाजाशी संबंधित समस्यांचंही समाधान करायला हवं, असे हेगडे यांनी म्हटलंय. कंपनीच्या सीईओंना पत्र लिहून हेगडे यांनी हिंदू बांधवांमध्ये रोष निर्माण करणाऱ्या जाहिरातींकडे आपण लक्ष द्यावं, असे पत्रातून सूचवले आहे.
आपल्या कंपनीने आमीर खान यांना घेऊन एक जाहीरात केली आहे. त्यामध्ये, आमीर खान हे रस्त्यावर फटाके न फोडण्याचा सल्ला देत आहेत. सामाजिक जाणीवेतून आणि सार्वजनिक मुद्द्यासंदर्भातील तुमचा हा प्रयत्न चांगला आहे. आपली जाहिरातीही कौतुकास्पद आहे, पण अशाच एका मुद्द्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. शुक्रवार आणि इतर महत्त्वाच्या सणाला मुस्लीमांकडून रस्ते जाम केले जातात. भारतामध्ये ही सर्वसामान्य बाब आहे, जेथे मुस्लिमांकडून रस्ता अडवला जातो, आणि नमाज अदा केली जाते, असे त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.