नवी दिल्ली : ‘अतुल्य भारत’ मोहिमेचा चेहरा बनलेला अभिनेता आमीर खान यापुढे ब्रॅण्ड अॅम्बेसडर म्हणून दिसणार नाही, त्याचा करार संपला असल्याचा खुलासा सरकारने केला असला तरी अलीकडेच आमीरने केलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न होत आहे. पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जावे का? अशी विचारणा केल्याचे सांगत आमीरने देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशातील असुरक्षित वातावरणात मुलांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.‘मॅककॅन वर्ल्डवाईड’ या संस्थेने आमीरशी ‘अतिथी देवो भव’ या जाहिरातीसाठी केलेला करार संपला आहे, त्यामुळेच आपसूकच संबंधित व्यवस्था संपुष्टात आली आहे. मंत्रालयाने त्याच्याशी करार केला नव्हता, असे पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी नमूद केले. आमीर अद्यापही पर्यटन मंत्रालयाचा ब्रॅण्ड अॅम्बेसडर आहे काय? यावर त्यांनी निश्चितच नाही, असे उत्तर दिले. अतुल्य भारत मोहिमेचा एक भाग म्हणून ‘अतिथी देवो भव’ची जाहिरात केली जात होती. ही संपुआ सरकारच्या काळातील योजना होती. या मुद्यावर बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आरटीआयअंतर्गत प्रश्न विचारण्यात आला असता मंत्रालयाने संदिग्ध निवेदन दिले होते.> आमीर खानबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या तरी पर्यटन मंत्रालयात कोणताही बदल झालेला नाही. समाजजागृतीसाठी मोहिमेची जबाबदारी मॅककॅन वर्ल्डवाईडकडे सोपविण्यात आली आहे. या कंपनीने आमीरशी केलेला करार संपला आहे, असे मंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले.
‘अतुल्य भारत’मधून आमीर खान बाहेर
By admin | Published: January 07, 2016 2:06 AM