मुंबई, दि. 6 - बॉलिवूड अभिनेता आमिर खानला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्याने स्वत:ही माहिती दिली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या परितोषिक वितरण सोहळ्यात, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाला. यावेळी त्यानं आपल्या अनुपस्थितीबाबत सांगताना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याची माहिती दिली. याच कार्यक्रमात आमिरनं त्याची पत्नी किरण रावलाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं सांगितलं. स्वाईन फ्लू झालेल्या रूग्णाला आराम करण्याची आणि औषधं घेण्याची आवश्यकता असते. त्याचमुळे आपण पाणी फाऊंडेशच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात हजर राहू शकलो नाही असं आमिर खाननं म्हटलं आहे. तसंच सगळ्या विजेत्यांचे त्यानं आभारही मानले आहेत
आज पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये पाणी फाऊंडेशनच्या वतीने राज्यातील 13 जिल्ह्यांतील 30 तालुक्यामधील 1300 पेक्षा अधिक गावांमध्ये घेण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम सुरु आहे. या समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अतुल कुलकर्णी, शाहरुख खानसह दिग्गज उपस्थित होते.
बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपरयातून नागरिक आले आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केलं. पाणी फाऊंडेशनच्या कामातून अशक्य ते शक्य केलं. मराठी माणूस जे बोलतो ते करून दाखवतो. महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठं काम झालं आहे. रिलायन्स फाऊंडेशन यापुढंही मदत करणार असल्याचे यावेळी निता अंबानी यांनी स्पष्ट केलं.