ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - 'अभिनेता आमिर खान हा देशद्रोही आहे' असे वादग्रस्त आणि खळबळजनक वक्तव्य भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी केले असून यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत. आमिरला ' अतुल्य भारत'च्या ब्रँड अॅम्बेसेडर पदावरून काढून त्याच्या जागी अमिताभ बच्चन यांची नेमणूक करण्यात आल्याबद्दल संसदीय स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत पर्यटन मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या तिवारी यांनी ही मुक्ताफळे उधळल्याचे वृत्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान भाजपा खासदार आणि भोजपुरी गायक असलेले तिवारी यांनी आमिरबद्दल हे वक्तव्य केले. ' आमिर खान देशद्रोही आहे, त्याला देशाबाहेर हाकलले पाहिजे' असे तिवारी म्हणाले. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा बैठकीस उपस्थित असलेल्या इतर अधिका-यांनी निषेध केला.
यासंबंधी तिवारी यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी काहीही उत्तर देण्यास नकार दिला. ' स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान घडलेल्या चर्चा व इतर घडामोडी अतिशय गुप्त असतात, त्यामुळे मी यावर काहीही कॉमेंट करू इच्छित नाही' अशी प्रतिक्रिया तिवारी यांनी दिली.
देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवले होते असे वक्तव्य गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान आमिरने केले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर चहूबाजूंनी टीका झाली, अनेकांनी त्याला देश सोडून जायचा सल्लाही दिला होता. त्यानंतर त्याला ' अतुल्य भारत'च्या ब्रँड अॅम्बेसेडर पदावरून काढण्यात आले तसेच त्याची सुरक्षाही कमी करण्यात आली.