ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - भारतीय जनता पक्षाचे नेते राम माधव यांनी असहिष्णूतेचा मुद्दा उपस्थित करत अभिनेता आमीर खानवर निशाणा साधला आहे. आमीर रिक्षा चालकाला देशाचा सन्मान, आदर कसा राखावा हे शिकवतो पण तीच गोष्ट तो स्वत:च्या पत्नीला शिकवत नाही अशी टीका राम माधव यांनी केली.
देशातील वाढत्या असहिष्णूतेमुळे आपल्या पत्नीने देश सोडून जाण्याचा विचार व्यक्त केला होता या आमीरच्या विधानावरुन मध्यंतरी वाद निर्माण झाला होता. त्याचा संदर्भ देऊन राम माधव यांनी आमीरवर निशाणा साधला.
दिल्ली विद्यापीठातील एका महाविद्यालयात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपण बदलाबद्दल बोलतो आपल्याला सर्वप्रथम आपल्या देशाचा सन्मान करायला शिकले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या वर्ष-दीडवर्षात परदेश दौरे केले. विविध अन्य देशांना भेटी दिल्या त्यानंतर आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे असे राम माधव म्हणाले. आपले सरकार देशाच्या सुरक्षेशी अजिबात तडजोड करणार नाही असे त्यांनी सांगितले.