ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - अभिनेता आमिर खानच्या देश सोडून जाण्याच्या वक्तव्यावर आता चहुबाजूंनी जोरदार टीका होत असून अभिनेते अनुपम खेर यांनी आमिरच्या वक्तव्यावर नाराजी नोंदवत त्याला लोकांमध्य भीती नव्हे तर आशा पसरवण्याचा सल्ला दिला आहे. देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवल्याचे आमिरने काल एका कार्यक्रमात नमूद केले होते. त्यावरूनच आता विविध चर्चा सुरू झाल्या असून अनुपम खेर यांनी आमिरला ट्विटरवरून काही प्रश्न विचारले आहेत.
' डिअर आमिर खान, तुम्ही किरणला विचारलेत का की तिला कोणत्या देशात जाऊन रहायला आवडेल? आणि याच देशाने तुम्हाला 'आमिर खान' बनवले आहे, हे तुम्ही तिला सांगितलं आहे का?' असा सवाल खेर यांनी ट्विटरवरून विचारला आहे. 'या देशात तुम्ही जीवनातील काही अतिशय वाईट क्षण घालवले आहेत, मात्र तेव्हाही तुम्ही हा देश सोडण्याचा विचार केला नव्हता, हे तुम्ही किरणला सांगितलतं का? 'अतुल्य भारत' तुमच्यासाठी केव्हापासून 'असिहष्णू भारत' बनला असेही खेर यांनी विचारले. 'जर देश असहिष्णू बनला आहे, असे मानून चाललो तर तुम्ही लाखो भारतीयांना देश सोडण्यास सांगाल की बदलाव होण्याची वाट पाहण्याचा सल्ला द्याल?' असे खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले. 'सत्यमेव जयते'मधून तुम्ही समाजातील अनिष्ट प्रथांवर प्रकाश टाकतानाही लोकांमध्ये आशेचा किरण निर्माण केला होता. मग आताच्या 'असहिष्णू' काळातही तुम्ही भीती न पसरवता लोकांना आशा दाखवली पाहिजे, असा सल्ला खेर यांनी आमिरला दिला.
तर देशाला आपली मातृभूमी मानणारा माणूस देश सोडून जाण्याचा विचारच करणार नाही, असे अभिनेते व खासदार परेश रावल यांनी म्हटले आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही आमिरच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना हिंदूबहुल देशात तीन-तीन मुस्लिम सुपरस्टार असताना भारतात असहिष्णुता कशी असा सवाल विचारला आहे.
ट्विटरकरांनीही व्यक्त केली नाराजी
बॉलिवूड कलाकारांसोबतच ट्विटरकरांनीही आमिरच्या वक्तव्यावर नाराजी नोंदवत त्याच्यावर टीका केली.
@AdityaMohrir - भारत असिहष्णू असल्याचे वक्तव्य आमिर माहिती व प्रसारण मंत्री आणि अर्थमंत्र्यांसमोर करू शकला , त्यावरूनच हे सिद्ध होतो की भारत किती सहिष्णू देश आहे.
@Chadhajii - अतिथी देवो भव म्हणत परदेशी नागिरकांना भारताला भेट देण्याचे निमंत्रण देणा-या आमिर खानलाच भारताबाहेर जायचे आहे. ही किती दुर्दैवी गोष्ट आहे.
एकीकडे आमिरवर टीका होत असतानाच त्याला गेल्या आठवड्यातच शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या कुटुंबियांचा दाखला देऊन त्यांची तुलना करण्यात येत आहे. एकीकडे आमिरच्या बायकोला मुलांची काळजी वाटते म्हणून तिला देश सोडून जावेसे वाटत आहे. तर दुसरीकडे देशासाठी प्राण देणारे कर्नल महाडिक यांची पत्नी स्वत: सैन्यात जाऊन देशाची सेवा करण्याची निर्आधर व्यक्त करत आहे. वयाची मर्यादा ओलांडली आहे म्हणून नाहीतर लेडी आर्मी ऑफिसर बनण्याची माझी खूप इच्छा आहे, अशी भावना शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती यांनी व्यक्त केली. आपली दोन्ही मुलही लष्करातच जातील असा निर्धारही त्यांनी यापूर्वी व्यक्त केला होता.