नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने (आप) पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत घेत भाजपा आमच्या नेत्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा मोठा दावा केला आहे. या पत्रकार परिषदेची सुरुवात करताना पक्षाचे नेते संजय सिंह यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, आज आम्ही नरेंद्र मोदी सरकारचे नापाक हेतू उघड करू. मोदी सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहे असं म्हणत संजय सिंह यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
"भाजपाकडून आमच्या आमदारांना 20 कोटींची ऑफर" देत असल्याचा गंभीर आरोप आपने केला आहे. तसेच भाजपा दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही संजय सिंह यांनी केला. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर त्यांनी केलेले प्रयत्न इतर आमदारांसोबत केले जात आहेत. तपास यंत्रणेला धमकावून भाजपा दिल्लीतील आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
आमदारांची नावे घेत ते म्हणाले की, अजय दत्त (Ajay Dutt), सोमनाथ भारती (Somnath Bharti), कुलदीप (Kuldeep Singh), संजीव (Sanjeev) यांना भाजपाने ऑफर दिली आहे. संजय सिंह म्हणाले की, भाजपाचे लोक त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात 20 कोटींची ऑफर घ्या नाहीतर तुमच्यावरही सिसोदिया यांच्यासारखे खोटे गुन्हे दाखल करू.
संजय सिंह पुढे म्हणाले की ही दिल्ली आहे आणि आम्ही केजरीवालांचे सैनिक आहोत. आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला पण आमच्या आमदाराने यांचं स्टिंग केलं. त्याचवेळी आप नेते सोमनाथ भारती यांनीही भाजपाचे लोक माझ्याकडे आल्याचा आरोप केला आहे. त्यांनी मला सांगितले की आमच्याकडे या नाहीतर मनीषला सिसोदियासारखी अवस्था करू. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.