पंजाबमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. याच दरम्यान आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी होशियारपूरच्या छब्बेवाल येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपा आणि काँग्रेसला धारेवर धरलं. यासोबतच पंजाबमधील भगवंत मान यांच्या सरकारचंही कौतुक केले. आम्ही जे काही आश्वासन दिलं आहे, ते आम्ही पूर्ण केलं आहे. राज्यातील आधीचं सरकार लाच घेऊन नोकऱ्या देत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.
"अनेक ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे. अनेक ठिकाणी भाजपाचं सरकार आहे. वीजबिल अर्ध करण्याचं आश्वासन दिलं होतं, ते आम्ही पूर्ण केलं. रुग्णालयात उपचार मोफत आहेत. संपूर्ण पंजाबमध्ये शाळांची दुरुस्ती केली जात आहे. दिल्ली आणि पंजाबमधील आमच्या सरकारने जे सांगितलं ते पूर्ण केलं आहे. पंजाबमध्ये आधी लाच घेऊन आणि शिफारशी करून नोकऱ्या मिळत होत्या, आता तसं नाही" असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
जनतेला आवाहन करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, "एकदा आम्हाला मतदान करा कारण राज्य सरकार आपलं आहे आणि आमदारही आपले आहेत, त्यामुळे आम्ही एकत्र काम करू आणि कोणतंही भांडण होणार नाही. तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मत दिल्यास ते भांडतील. त्यामुळे तुमचं कोणतंही काम होणार नाही. २० नोव्हेंबर रोजी तुम्ही सर्वात आधी मतदान करा. इशांकला ऐतिहासिक बहुमताने विजयी करा."
आम आदमी पार्टीने (आप) खासदार डॉ. राज कुमार यांचा मुलगा इशांक कुमार यांना तिकीट दिलं आहे. ईशान यांचे वडील डॉ. राज कुमार होशियारपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. होशियारपूर जिल्ह्यातील छब्बेवाल विधानसभा जागेवर २० नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या ४ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.