नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "गरिबांच्या जेवणावर टॅक्स आणि श्रीमंतांचं 5 लाख कोटींचं कर्ज माफ" असं म्हणत निशाणा साधला आहे. केंद्राने पेन्शन सुविधा बंद करण्यासाठी अग्निवीर योजनेची सुरुवात केली. केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग आणण्यासाठी देखील मनाई केली. तसेच मनरेगासाठी पैसे नसल्याचं म्हटलं असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत व्हिडीओ ट्विट केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी "पहिल्यांदा तांदूळ-गव्हावर टॅक्स लावण्यात आला. कोणत्याच सरकारने याआधी असं क्रूर पाऊल उचललं नाही. केंद्र सरकारची अशी काय अवस्था झाली? सरकारी शाळेत फी घेतली गेली तर अर्ध्याहून अधिक मुलं निरक्षर राहतील. गरीब माणसं कुठून आणतील पैसे? उपचारासाठी काय करणार?, केंद्र सरकारचा हा सगळा पैसे नेमका जातो कुठे?... यांनी सरकारी पैशांनी आपल्या मित्रांची कोट्यवधी रुपयांची कर्ज माफ केली आहेत. कर्ज माफ नसतं केलं तर देशाची अशी अवस्था झाली नसती" असं म्हणत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूने भारतीय जनता पक्षाची साथ सोडली आणि राजदसोबत सरकार स्थापन केले आहे. यानंतर आता, आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपच्या अहंकारामुळेच त्यांचे मित्रपक्ष त्यांना सोडून जात आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी रावणाच्या अहंकाराचेही उदाहरण दिले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले, "बिहारमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, त्यावरून भाजप प्रचंड अहंकारी होत असल्याचे दिसून येते. त्याच्या अहंकारामुळे जनताही त्याच्यावर नाराज होत आहे आणि देशभरात मित्र पक्षही त्यांची साथ सोडत आहेत. शिवसेनेने त्यांची साथ सोडली आहे. अकाली दलानेही त्यांची साथ सोडली आहे आणि आता जेडीयूनेही त्यांची साथ सोडली आहे.