दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, रविवारी (२ जून) ते सरेंडर करणार आहेत. "सर्वोच्च न्यायालयाने मला २१ दिवसांची मुदत दिली होती. उद्या २१ दिवस पूर्ण होत आहेत. परवा (रविवार) सरेंडर करावं लागणार आहे. मी तिहार जेलमध्ये जाईन, मला माहीत नाही की ते मला तिहार जेलमध्ये किती काळ ठेवतील. देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी जेलमध्ये जात आहे."
"इन्सुलिनची इंजेक्शन दिवसातून चार वेळा दिली जातात. जेलमध्ये त्यांनी अनेक दिवस माझं इंजेक्शन बंद केलं, माझी शुगर ३००-३२५ पर्यंत पोहोचली. इतके दिवस शुगर हाय राहिली तर किडनी आणि लिव्हर खराब होतात. त्यांना काय हवं होतं, त्यांनी असं का केलं ते माहीत नाही" असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
"मी ५० दिवस जेलमध्ये होतो आणि या ५० दिवसांत माझं वजन ६ किलो कमी झाले. मी जेलमध्ये गेलो तेव्हा माझं वजन ७० किलो होतं, आज ते ६४ किलो आहे. जेलमधून सुटल्यानंतरही माझं वजन वाढत नाही. शरीरात काही मोठा आजार असण्याची शक्यता असून अनेक तपासण्या कराव्या लागतील, असं डॉक्टर सांगत आहेत. युरीनमध्ये कीटोनचे प्रमाण खूप वाढलं आहे."
"परवा मी सरेंडर करेन. त्यासाठी दुपारी तीनच्या सुमारास मी माझ्या घरातून बाहेर पडेन. कदाचित यावेळी ते मला आणखी छळतील. पण मी झुकणार नाही. तुम्ही तुमची काळजी घ्या, जेलमध्ये मला तुमची खूप काळजी वाटत असते. तुम्ही आनंदी असाल तर तुमचे केजरीवालही खूश होतील. अर्थात मी तुमच्यामध्ये नसेन, पण काळजी करू नका."
"तुमचं सर्व काम चालूच राहील, मी कुठेही असलो, आत असो वा बाहेर, मी दिल्लीचं काम थांबू देणार नाही. तुमची मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक, हॉस्पिटल, मोफत औषधे, उपचार, महिलांसाठी मोफत बस प्रवास, २४ तास वीज आणि इतर सर्व कामं सुरूच राहतील. परत आल्यानंतर मी प्रत्येक आई-बहिणीला दरमहा हजार रुपये देण्यासही सुरुवात करेन."
"प्रार्थनेत मोठी शक्ती आहे. जर तुम्ही माझ्या आईसाठी दररोज प्रार्थना केली तर ती नक्कीच निरोगी राहील. माझी पत्नी सुनीता खूप खंबीर आहे, तिने आयुष्यातील प्रत्येक कठीण क्षणी मला साथ दिली आहे. जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. आपण सर्व मिळून हुकूमशाहीशी लढत आहोत."
"देशाला वाचवण्यासाठी मला काही झालं, माझा जीव गेला तरी दुःखी होऊ नका. तुमच्या प्रार्थनेमुळे मी आज जिवंत आहे आणि तुमचे आशीर्वाद भविष्यातही माझे रक्षण करतील. शेवटी मी एवढेच सांगू इच्छितो की, तुमचा मुलगा लवकरच परत येईल" असं देखील अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.