नवी दिल्ली - पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर, पंजाब आणि गोवा या प्रमुख राज्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. निवडणूका सात टप्प्यात होणार असून 10 मार्चला निकाल जाहीर होणार आहे. राजकीय पक्ष हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (AAP Arvind Kejriwal) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (Congress P Chidambaram) हे ट्विटरवर भिडलेले पाहायला मिळत आहेत. देशातील सर्वात जुना पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा आशास्थान आहे, गोव्यातील लोकांचा नाही असा सणसणीत टोला अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला लगावला आहे.
पी चिदंबरम यांनी गोव्यातील जनतेला आवाहन करताना योग्य शासनाची निवड करत काँग्रेसला मदत देण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विधानाचा आधार घेऊन गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष बिगरभाजपा मतांना खंडित करेल असा माझा अंदाज आहे. केजरीवालांनीही हे मंजूर केलं आहे. गोव्यात सामना काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे असं म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटला आता अरविंद केजरीवाल यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. "रडगाणं बंद करा सर…तुमच्या 17 पैकी 15 आमदारांनी भाजपात प्रवेश केला" असं म्हणत निशाणा साधला आहे.
"काँग्रेस भाजपासाठी आशास्थान आहे, गोव्यातील जनतेसाठी नाही"
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "रडगाणं बंद करा सर…जिथे आशा आहेत त्यांना जनता मत देईल. काँग्रेस भाजपासाठी आशास्थान आहे, गोव्यातील जनतेसाठी नाही. तुमच्या 17 पैकी 15 आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसचं प्रत्येक मत भाजपाला जाईल याची खात्री बाळगत आहे. भाजपाला मत देण्यासाठी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला जात आहे" असं म्हटलं आहे. गोव्याच्या एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
'...तर मी त्यांचा नरकापर्यंत पाठलाग करेन'
पंजाब निवडणुकीसाठी आपने उमेदवारीची तिकिटं विकल्याचा आरोप इतर पक्षांकडून केला जात आहे. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच भ्रष्टाचाराविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. "एकही तिकीट विकलं गेलेलं नाही. जर तुम्ही कोणीही पुराव्यांनिशी सिद्ध करून दाखवू शकलात की अमुक एका व्यक्तीने तिकीट विकलं आणि अमुक एका व्यक्तीने ते खरेदी केलं, तर 24 तासांच्या आत त्याला पक्षातून काढून टाकेन" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तसेच "मी काहीही सहन करू शकतो, पण भ्रष्टाचार सहन करू शकत नाही. जर हे सिद्ध झालं की तिकिटाची खरेदी-विक्री झाली आहे, तर मी त्या दोघांना फक्त पक्षातून निलंबित करून थांबणार नाही, त्यांचा नरकापर्यंत पाठलाग करेन. मी त्यांना सोडणार नाही. जेलमध्ये पाठवेन" असंही म्हटलं आहे.