चंदीगड : आम आदमी पार्टी (AAP) रामराम ठोकून आशु बांगर (Ashu Bangar) हे काँग्रेसमध्ये (Congress) दाखल झाले आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपवर गंभीर आरोप केले आहेत. आपचे तिकीट मिळवण्यासाठी मला 50 लाख रुपये मोजावे लागले होते. त्यानंतरही माझ्यावर पैसे देण्यासाठी दबाव आणला जात होता, त्यामुळे पक्ष सोडला, असे गुरुवारी फिरोजपूरमध्ये आशु बांगर यांनी सांगितले. तसेच, आपमध्ये होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्येचा विचार केला होता, असे आशु बांगर यांनी म्हटले आहे.
फिरोजपूर देहाटमधून आपचे उमेदवार राहिलेले आशु बांगर, जे आता आप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत आणि देहाटमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. ते म्हणाले की, जेव्हा त्यांना पदभार द्यायचा होता, तेव्हा रात्री मोगाचे प्रभारी नवदीप सिंग संघा यांचा फोन आला की, उद्या तुमचा ब्रेक फास्ट मोगा येथे आहे, तुम्हाला एका मोठ्या व्यक्तिमत्वाला भेटायचे आहे. त्यानंतर मोगाला गेलो असता नवदीप सिंग संघा आणि हरपाल सिंग चीमा बसले होते. त्यांनी सांगितले, तुम्हाला तिकीट मिळणार नाही. जर तिकीट हवे असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील.
'केजरीवालांनी ऐकले नाही'मी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदर केजरीवाल यांना सर्व पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच ऐकले गेले नाही. दिल्लीतील ज्येष्ठ नेते पैसे घेऊन तिकीट वाटप करत आहेत, मात्र, केजरीवाल म्हणतात की, कोणीतरी पैसे देऊन आपकडून तिकीट घेतल्याचा पुरावा दाखवा. पण, मी तिकिटासाठी पैसे घेतल्याचे पुरावे देतो, असे आशू बांगर म्हणाले. तसेच, फिरोजपूरचे प्रभारी असल्यापासून तिकिट देण्यापर्यंत पन्नास लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत, याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आशु बांगर यांनी केला आहे.
पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला निवडणूकपंजाब विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात, प्रत्येक पक्ष आता पूर्ण जल्लोषात मतदारांना आपापल्या बाजूने आकर्षित करण्यात व्यस्त आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला निवडणुका होत आहेत. आम आदमी पार्टीने भागवत मान यांना पंजाबमध्ये पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित केले आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्याशिवाय सुनील जाखरा यांच्याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. पंजाब सरकारचे अनेक मंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनाच मुख्यमंत्र्याचा चेहरा सांगत असले तरी. त्याचवेळी नवज्योतसिंग सिद्धू यांनीही अनेकदा आपल्या वक्तव्याने मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होण्याचे संकेत दिले आहेत.