दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. यानंतर आता दिल्लीतील आप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी खूप गोंधळ घातला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून यामध्ये तीन मंत्र्यांचा देखील समावेश आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आपचे कार्यकर्ते, नेते आणि आमदारांनी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी मार्लेना यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 'आप'च्या महिला कार्यकर्त्यांना बसमध्ये बसवण्यात आले. दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांना देखील दिल्ली पोलिसांनी आयटीओ येथे ताब्यात घेतले आहे. केजरीवाल यांच्या अटकेविरोधात पक्षाचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत. अरविंद केजरीवाल यांना त्यांचे वकील आणि कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी द्यावी, असे आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर म्हणू, असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे.
आयटीओ येथे आंदोलन करणाऱ्या आतिशी मार्लेना यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. आतिशी यांच्याशिवाय सौरभ भारद्वाज, गोपाल राय आणि कुलदीप कुमार या पक्षाच्या नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. एकूणच, दिल्ली सरकारचे तीन प्रमुख मंत्री आतिशी, गोपाल राय आणि सौरभ भारद्वाज आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. या सर्व लोकांना बसमधून उत्तर दिल्लीला नेले जात आहे.
आतिशी यांना ताब्यात घेतलं जात असताना त्या म्हणाल्या की, "हे लोक आधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना खोट्या प्रकरणात अटक करतात, त्यानंतर शांततापूर्ण आंदोलकांनाही अटक केली जात आहे. ही लोकशाहीची हत्या नाही तर काय आहे?" केजरीवाल यांना अटक केल्यानंतर काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपा निवडणुकीच्या निकालाने घाबरलीय, अबकी बार... सत्ता के बाहर" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "रोज विजयाचे खोटे दावे करणारी अहंकारी भाजपा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना बेकायदेशीर मार्गाने कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे" असंही म्हटलं आहे.