चंदिगड - केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदिगडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. येथे नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष १४ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर भाजपाला १२ जागा मिळाल्या होत्या. तर ८ जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर अकाली दलाचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराने आपच्या उमेदवाराला मात देत सनसनाटी विजय मिळवला आहे.
या निकालानंतर आपचे नगरसेवक संतप्त झाले असून, त्यांनी महापौरांच्या खुर्चीमागेच आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.डीसी विनय प्रताप सिंह यांनासुद्धा घटनास्थळावर रोखण्यात आले आहे. तसेच महानगरपालिकेत मार्शल बोलावण्याची वेळ आली होती. तसेच धक्काबुक्कीही झाली. तसेच आपचे नगरसेवक महापौरांच्या शेजारच्या खुर्चीवर बसले आहेत.
चंदिगडच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने १२ जागा जिंकल्या होत्या. तर आपच्या खात्यात १४ जागा गेल्या होत्या. दरम्यान, काँग्रेसमधून काढण्यात आल्यानंतर देवेंद्रसिंह बबला हे त्यांची नवनिर्वाचित पत्नी हरप्रीत कौर बबला यांच्यासोबत भाजपामध्ये दाखल झाले होते. तर भाजपाच्या खासदार किरण खेर यांनाही येथे एक मत देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भाजपाकडे १४ मते झाली होती.
चंदिगड महानगरपालिकेमध्ये ३५ जागा आहेत. २४ डिसेंबर रोजी झालेल्या या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. दरम्यान, आज झालेल्या महापौर निवडणुकीत भाजपाने माजी नगरसेवक जगतार सिंह जग्गा यांची पत्नी सरबजीत कौर यांना महापौरपदाच्या उमेदवार बनवले आहे. तर आपने अंजू कत्याल यांना महापौरपदाची उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने निवडणुकीत सहभागी न होण्याची घोषणा केली होती. तसेच काँग्रेसने आपल्या उमेदवाराचे महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता.
सर्वच पक्षांना घोडेबाजाराची भीती होती. त्यामुळे काँग्रेसने आपल्या सर्व नगरसेवकांना राजस्थानमधील जयपूर येथे पाठवले होते. ते आजच परत आले होते. आपचे नगरसेवक दिल्लीमध्ये राहिले. त्यानंतर ते कसौलमध्ये आले नंतर ते चंदिगडमध्ये परतले. तर भाजपाने आपल्या नगरसेवकांना सिमला येथे पाठवले होते. शुक्रवारी संध्याकाळी ते माघारी परतले होते. दरम्यान, महानगरपालिकेतील एकूण ३५ नवनिर्वाचित नगरसेवकांनी १ जानेवारी रोजी शपथ घेतली होती.