- चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा मुख्य सामना देशातील तीन राष्ट्रीय पक्षांमध्ये होणार असला, तरी आम आदमी पक्षाने सध्या प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही राजकीय घडामोडींमुळे देशाच्या राजधानीचा उष्मांक वाढला आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष दिल्लीची सत्ता तिसऱ्यांदा मिळविण्यासाठी मैदानात उतरला आहे. तर, भारतीय जनता पक्षाने २७ वर्षांचा वनवास संपविण्यासाठी कंबर कसली आहे. कॉंग्रेसही मैदानात आहे. परंतु, फारशी सक्रियता दिसून येत नाही.
भारतीय जनता पक्ष मागील २७ वर्षांपासून दिल्लीच्या सिंहासनावर बसण्याची प्रतीक्षा करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण कॅबिनेट आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री भाजपचा प्रचार करण्यासाठी दिल्लीच्या मैदानात उतरणार आहे. गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपशासित राज्यांचे १२ मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार आहेत.
आम आदमी पक्षाने प्रचार कसा करायचा?, यावर कार्यकर्त्यांना ९० मिनिटांचे प्रशिक्षण दिली आहे. प्रत्येक बुथवर १५ ते २० कार्यकर्ते तैनात केले आहेत. बुथवरील मतदारांपर्यंत पोहचणे ही त्यांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री आतिशी मर्लोना यांच्याशिवाय माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह खासदार व आमदारांच्या खांद्यावर वेगवेगळ्या मतदारसंघांची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
२०२० ची आकडेवारी २०२० मधील निवडणुकीत आम आदमी पक्षाला ५३.५७ टक्के मतांसह ६२ जागा मिळाल्या, तर भाजपला ८ जागांसह एकूण ३८.५१ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला ४.२६ टक्के मते मिळाली होती, परंतु एकही आमदार निवडून आला नव्हता.