‘झाडू’ बिघडवू शकतो भाजपपेक्षा काँग्रेसचे गणित; राष्ट्रीय दर्जाही मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 06:08 AM2022-12-11T06:08:13+5:302022-12-11T06:08:28+5:30
आगामी विधानसभा निवडणुका लक्ष्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने (आप) गुजरातमध्ये पदार्पणातच ५ जागा मिळविल्या. आपने गुजरातमध्ये १२.९ टक्के मते मिळविली़. त्यामुळे काँग्रेसचे गणित बिघडले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ४२.२ टक्के मतांसह ७७ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र, केवळ २७.३ टक्के मते आणि १७ जागा मिळाल्या आहेत. आपमुळे इतरही अनेक राज्यात काँग्रेसचे गणित असेच बिघडू शकते.
गुजरात निवडणुकीमुळे आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकात आप पूर्ण शक्तिनिशी उतरू शकते.
आपचे तीन खास घटक
nमुस्लीम मते : भाजपला मत न देऊ इच्छिणाऱ्या अल्पसंख्याक मतदारांना काँग्रेसशिवाय नवीन पर्याय मिळू शकतो.
nआदर्श राज्य : दिल्लीतील विकासाचे मॉडेल दाखवून आप डाव खेळत आहे. त्यामुळे इतर पक्षांना विकासाच्या मुद्द्यावर यावे लागत आहे.
nनवे चेहरे : नवे चेहरे देऊन आप अँटी इनकम्बन्सीचा लाभ उठवित आहे.
‘त्या’ जागांवर आपचा डोळा
गेल्या निवडणुकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील कमी अंतराने निकाल लागलेल्या जागांवर आपचा डोळा आहे. तेथील गणित आपमुळे बदलू शकते. ५ टक्क्यांपेक्षा कमी फरकाने हार-जीत झालेल्या जागा राजस्थानात ५८, मध्य प्रदेशात ७१ आणि छत्तीसगडमध्ये १८ होत्या. या जागांवर आप जाेर लावू शकते.
या राज्यांमध्ये आपला आहे संधी
गुजरातप्रमाणेच या राज्यांतही काँग्रेसला फटका बसू शकतो. या राज्यांत आतापर्यंत भाजप आणि काँग्रेस यांच्यातच मुख्य मुकाबला होत आला आहे. बसपा तिसरा राष्ट्रीय पक्ष असला, तरी येथे त्याची उपस्थिती नगण्य आहे. प्रादेशिक पक्षही येथे मजबूत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आपला संधी आहे.