नवी दिल्ली - दिल्लीत आम आदमी पक्षाच्या झाडूची जादू कायम राहणार असल्याचं सुरुवातीच्या निकालावरुन स्पष्ट होत आहे. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. यंदाही 50+ जागेवर आपला विजय मिळेल असे दिसत आहे. सध्या, 54 जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.
आम आदमी पक्षाची विजयी आघाडी होताच, आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयात गर्दी केली असून विजयी जल्लोष साजरा होत आहे. तसेच, केजरीवाल यांच्या घराजवळही कार्यकर्ते गर्दी करत आहेत. पक्षाकडून लाडूची मोठी ऑर्डरही देण्यात आली आहे. तर, केजरीवाल यांनी फटाके न फोडण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केलंय. केजरीवाल यांच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. या शुभेच्छांसाठी ज्युनिअर केजरीवालही पोहोचला आहे. गळ्यात मफलर, डोक्यावर टोपी, डोळ्यावर चष्मा अन् हलकिशी मिशी असलेला चिमुकला अरविंद केजरीवाल यांचं हुबेहुब रुप घेऊन यंदाच्या निवडणुकीचं आकर्षण बनला होता. ज्युनियर केजरीवाल नावाने तो सध्या फेमस आहे. आपनेही या ज्युनियर मफलरमॅनचा फोटो शेअर केला आहे.
दिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाल्यास दिल्लीमध्ये सलग तिसऱ्यांदा केजरीवाल याचं सरकार बनणार आहे. दिल्लीकरांसाठी 5 वर्षे कामं केल्यामुळे आपचा विजय निश्चित असल्याचं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. 'दिल्लीत विजय होणार याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण गेल्या पाच वर्षात आम्ही इथल्या लोकांसाठी काम केली आहेत' असं त्यांनी म्हटलं आहे.