CAA : 'दिल्लीतील हिंसाचाराला काँग्रेस व आप जबाबदार'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 04:14 PM2020-01-01T16:14:20+5:302020-01-01T16:19:05+5:30
दिल्लीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उफाळलेल्या हिंसाचारावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उफाळलेल्या हिंसाचारावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपाने या हिंसाचारासाठी काँग्रेस व आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचारास काँग्रेस व आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. बुधवारी (1 जानेवारी) नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून जावडेकरांनी आप आणि काँग्रेसवर टीका केली आहे.
'दिल्लीसारख्या शांततामय शहरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल चुकीची माहिती पसरवून जे वातावरण निर्माण करण्यात आले व येथील संपत्तीचे नुकसान झाले आहे. काँग्रेस व आम आदमी पक्ष यासाठी जबाबदार आहे. त्यांनी जनतेची माफी मागायला हवी' असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे.
Union Minister Prakash Javadekar: In a peaceful city like Delhi, the atmosphere that was created by spreading misinformation on #CitizenshipAmendmentAct, and the damage that was done to property, Congress and AAP are responsible for it.They must apologise to the people. pic.twitter.com/7NTR4OKocK
— ANI (@ANI) January 1, 2020
सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. यातच केंद्र सरकारने आता देशात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधक आणखीनच आक्रमक झाले असून या मुद्द्यांवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भाजपावर सतत निशाणा साधत आहेत. याला प्रतिउत्तर देताना काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधी 2019 मधील सर्वांत जास्त खोटारडे असून एनपीआरचा टॅक्सशी संबंध असल्याचे त्यांचे म्हणणे हास्यास्पद असल्याचं म्हटलं होतं.
"राहुल गांधी 2019 मधील सर्वांत खोटोरडे आहेत. भ्रष्टाचार हीच काँग्रेसची संस्कृती आहे. काँग्रेसमध्ये 2जी टॅक्स, जयंती टॅक्स आणि कोळसा टॅक्स होता. एनपीआरला गरिबांवरील टॅक्स म्हणणे हास्यास्पद आहे. एनपीआरच्या माध्यमातून गरिबांना मदत केली जाईल" असं जावडेकर यांनी म्हटलं होतं. तसेच हरयाणामधील कुरुक्षेत्र येथील भाजपा खासदार तसेच माजी मंत्री नायब सिंह सैनी यांनी राहुल गांधींवर टीका करताना मंगळवारी एक वादग्रस्त विधान केलं. 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत' असं नायब सिंह सैनी यांनी म्हटलं होतं. तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल राहुल गांधी यांना काहीही माहिती नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं. नायब सिंह सैनी यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख महामूर्ख असा केला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे कोणत्याही नागरिकाचं नागरिकत्व काढून घेण्यात येणार नाही ही गोष्ट राहुल गांधी यांना माहिती नसल्याचा टोला त्यांनी लगावला होता. 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत. सीएए हे नेमकं काय आहे आणि कशासाठी आहे हेच त्यांना माहीत नाही' असं सैनी यांनी म्हटलं होतं.