नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकासाठी आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दोन्ही पक्षांनी हरयाणा आणि दिल्लीत आघाडी करण्याची तयारी केली आहे. असे सांगण्यात येत आहे की, दिल्लीत आघाडीचा 4-3 असा फॉर्म्युला असल्याचे समजते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी फक्त दिल्लीतच नाही तर हरयाणामध्ये करण्यात येणार आहे. आजच्या काँग्रेसच्या बैठकीत पीसी चाको, शीला दीक्षित, हारुन युसूफ यांच्यासस अन्य नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी, आम आदमी पार्टी दिल्लीतील चार जागांवर निवडणूक लढणार आहे, तर काँग्रेस तीन जागावर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
चांदणी चौक, उत्तर पश्चिम दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि उत्तर दिल्ली या मतदार संघासाठी आम आदमी पार्टी निवडणूक लढणार आहे. तर, काँग्रेल पूर्व दिल्ली, उत्तर दिल्ली आणि नवी दिल्ली मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.