Arvind Kejriwal Areest: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ INDIA आघाडीने दिल्लीत मेगा रॅलीचे आयोजन केले आहे. आप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. राजधानीतील दिल्लीतील रामलीला मैदानावर 31 मार्च रोजी रॅली काढण्यात येणार आहे.
आप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधानांनी मोदींनी हुकूमशाही वृत्तीने लोकशाहीची हत्या केली आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली. यामुळे जनतेच्या मनात आक्रोष आहे. एजन्सीचा वापर करुन, आमदार-खासदार खरेदी करुन, खोटे खटले दाखल करुन संपूर्ण विरोधी पक्षाला एक एक करुन संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. दिल्लीप्रमाणे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही अटक करण्यात आले.
पश्चिम बंगालपासून ते बिहारपर्यंत इंडिया आघाडीच्या नेत्यांना खोटे गुन्हे दाखल करून गप्प करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज दिल्लीत निदर्शने सुरू आहेत, येत्या काही दिवसांत देशभरात निदर्शने सुरू होतील.निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता लागू असतानाही आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय कार्यालय सील करण्यात आले. अरविंद केजरीवाल आणि विरोधी पक्षनेत्यांनी भ्रष्टाचार केला, असे भाजप म्हणते, मात्र सर्वोच्च न्यायालयाने या आरोपांचे खंडन केले. देशातील तरुणांनी या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.