नवी दिल्ली: दिल्लीत आम आदमी पक्षाचे नेते सीबीआय कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत आहे. गेल्या दोन दिवसांपासून आप नेत्यांच्या शिष्टमंडळाला सीबीआय संचालकांची भेट घ्यायची आहे, मात्र अद्यापपर्यंत त्यांना वेळ देण्यात आलेली नाही. अशा स्थितीत बुधवारी 'आप'च्या नेत्यांनी रस्त्यावर बसून धरणे आंदोलन सुरू केले. आप नेने 'ऑपरेशन लोटस' प्रकरणात चौकशीची मागणी करत आहेत.
भाजपने राजधानीतील 'आप' सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालवल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. आमदारांना विकत घेण्याचे प्रयत्न झाले, असेही ते म्हणाले होते. आता केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार भाजप या मिशनमध्ये अपयशी ठरला आहे, पण त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपच्या शिष्टमंडळाला सीबीआय संचालकांना भेटायचे आहे. पण, भेटण्यासाठी अद्याप वेळ न मिळाल्याने, आपचे कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे.
आपचे अनेक नेते साबीआय कार्यालयाबाहेर हातात पोस्टर्स घेऊन ऑपरेशन लोटस प्रकरणाची चौकशी करण्याचे आवाहन आणि सीबीआय संचालकांना भेटण्याची मागणी करत आहेत. आधी मद्य घोटाळा, त्यानंतर उपराज्यपालांसोबत वाद आणि आता ऑपरेशन लोटसमुळे दिल्लीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजप 'आप'चे आरोप फेटाळत आहे, तर दुसरीकडे 'आप'ला सीबीआय चौकशी हवी आहे. दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.