नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत सत्ताधारी आप आणि भाजपमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. आता पुन्हा एकदा दोन्ही पक्ष आमने-सामने येण्याची शक्यता आहे. केजरीवाल सरकारने भाजपच्या निर्माणाधीन कार्यालयावर सुरू असलेले बांधकाम थांबवले आहे. तसेच, भाजपवर 5 लाखांचा दंडही ठोकला आहे. केजरीवाल सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील डीडीयू मार्गावरील भाजपच्या बांधकाम सुरू असलेल्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम आणि पाडकामाच्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय अचानक पाहणी करण्यासाठी आले होते. यादरम्यान राय यांनी दंडात्मक कारवाई केली. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी छापा टाकण्यापूर्वी बांधकाम साइटच्या गेटवर 'भारतीय जनता पार्टी सभागृह' असे लिहिले होते. छापा टाकल्यानंतर घाईघाईने नाव झाकण्यात आले.
दिल्लीत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू दिल्लीतील प्रदूषण पाहता सीक्यूएएमच्या आदेशानुसार तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम आणि पाडकामांवर बंदी घालण्यात आली आहे. बांधकाम कामांवर देखरेख ठेवण्यासाठी 586 पथके स्थापन करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर 521 वॉटर स्प्रिगलिंग मशीन, 233 अँटी स्मॉग गन, 150 मोबाईल अँटी स्मॉग गनच्या सहाय्याने पाण्याची फवारणी केली जात आहे.
AQI 400 पार राजधानीत वाढत्या प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. दिल्लीतील अनेक भागात मंगळवारी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 400 च्या वर आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणापासून अद्याप दिलासा मिळण्याची आशा नाही. किंबहुना, नोव्हेंबरमध्ये भात पिकांची कापणी जास्त असल्याने, प्रदूषणात वाढ होऊ शकते. यामुळे दिल्लीच्या हवेतील प्रदूषणाची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.