लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: दिल्ली विरोधीपक्ष म्हणून प्रसिद्ध असलेला आम आदमी पक्ष आता महिलाविरोधी पक्षही बनला असल्याचा आरोप गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीचे लोक विचारत आहेत की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पहिल्या दिवसांपासून स्वाती मालीवाल प्रकरणावर गप्प का आहेत? त्यांनी या विषयी काही तरी स्पष्टीकरण द्यावे. अरविंद केजरीवाल यांचे मौन या प्रकरणाबद्दल सर्व काही सांगते, 'असेही मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. 'आप' आता दिल्लीविरोधी, महिलाविरोधी पक्ष बनला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल स्वातींवर दबाव आणत असल्याची शंकाही त्यांनी वर्तविली आहे. सोनी मिश्रा प्रकरणातील केजरीवाल हे असेच वागले होते असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आप नेते वाल्मिकी नायक यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदे सांगितले की, मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारात मुद्द्याचे सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खासगी आरोप करत आहेत. दिल्लीची जनता त्यांचा या भूलथापांना बळी पडणार नाही. मुख्यमंत्री सावंत यांनी विकासावर बोलावे. दिल्लीचा किती विकास झाला आहे हे लोकांना माहिती आहे, असेही ते म्हणाले. यावेळी अॅड. सुरेल तिळवे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या विकासावर बोलावे. तसेच भाजपने दिल्लीवासीयांसाठी काय केले हे सांगावे. एखाद्या मुख्यमंत्र्यावर चांगले काम करत असल्याने खासगी आरोप करणे चुकीचे आहे, असे सांगून नायक म्हणाले, राज्यात सध्या चोऱ्या, खून अपहरण तसेच अन्य गुन्हेगारी वाढली आहे. पण सरकारचे याच्यावर काही नियंत्रण नाही. मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. त्यांना फक्त भाजप दिसत आहे. तर अन्य पक्षाचे नेत्यांना त्यांना जेलमध्ये टाकावे, असे वाटत आहे. पण केजरीवाल निर्दोष असून, ते पुन्हा २ जून रोजी जेलमध्ये जाणार नाहीत, असा विश्वास असल्याचेही नायक यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सिद्धी नाईक प्रकरणावर बोला: पालेकर
पणजी : स्वाती मालीवाल प्रकरणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करण्याऐवजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाच्या तपासावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पक्षाचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे दिल्लीत निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी त्यांनी स्वाती मालीवाल प्रकरणी आप नेते केजरीवाल का गप्प आहेत? असा प्रश्न केला होता. खरे तर मुख्यमंत्र्यांना या विषयाची कुठलीही माहिती नाही, अशी टीका त्यांनी केली. अॅड. पालेकर म्हणाले, की मालीवाल प्रकरणावरून आम आदमी पक्षाने यापूर्वीच जाहीर विधान जारी केले आहे. डॉ. सावंत यांनी केजरीवाल यांना या विषयावरून प्रश्न करण्याऐवजी सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला यावर गोव्यात आल्यानंतर विधान करावे. त्याचा तपास करण्याचा गोवा पोलिसांना पूर्णपणे अपयश आले आहे. सरकारला महिलांना सुरक्षा पुरवता आलेली नाही. गोवा पोलिसांना सिद्धी मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यात अपयश का आले यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.