नवी दिल्ली – पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक पार पडली आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या आमदारांसोबत व्हर्चुअल बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री भगवंत मान, आप नेते राघव चड्ढा हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आमदारांना ‘कानमंत्र’ दिला आहे.
अरविंद केजरीवाल(AAP Arvind Kejariwal) म्हणाले की, मी आज तुमच्याशी बोलताना आनंदी आहे. त्यासोबत भावूक देखील झालोय. पंजाबच्या लोकांनी आपवर विश्वास ठेवला आणि आम आदमी पक्षाच्या कामावर मतदान केले. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह तुम्ही सगळ्यांनी पंजाबच्या जनतेसाठी चांगले काम करायला हवे. शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे द्यायला हवेत. भ्रष्टाचार मुक्त पंजाब बनवण्याचं आपलं आश्वासन पूर्ण करायला हवं. पंजाब सरकारनं पहिल्या कॅबिनेटमध्ये २५ हजार बेरोजगार युवकांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला तो महत्त्वाचा आहे. लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत. ३ दिवसांत चांगले निर्णय झाले त्याबद्दल केजरीवालांनी पंजाब सरकारचं अभिनंदन केले.
तसेच भाजपा अद्यापही ४ राज्यांत सरकार बनवू शकत नाही. पदांवरून त्यांच्या नेत्यांमध्ये वाद सुरू आहेत. पंजाबमध्ये मी ऐकलं ज्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत ते नाराज आहेत. आपकडे ९२ आमदार आहेत. त्यातील १७ मंत्री बनू शकतात. तुम्ही स्वत:ला मंत्र्यांपेक्षा कमी समजू नका. वेगळ्या इच्छा ठेवू नका. एका टीमप्रमाणे काम करा. सर्वांना जबाबदारी मिळेल. भगवंत मान तुमच्यावर देतील ती जबाबदारी पूर्ण करा. तुमच्यापैकी ९९ टक्के पहिल्यांदा आमदार बनले आहेत. तुम्ही कधी आमदार व्हाल असा विचार केला नसेल. काहींनी मोठमोठ्या नेत्यांना हरवलं आहे. परंतु अहंकार बाळगू नका. कुठल्याही पदावर आपला हक्क आहे असं समजू नका. जनता त्यांना नाकारते हे आधीच्या नेत्यांकडे बघून कळेल असा कानमंत्र अरविंद केजरीवाल यांनी आमदारांना दिला आहे.
भ्रष्टाचारावर सज्जड दम
अरविंद केजरीवालांनी या बैठकीत भ्रष्टाचाराचा मुद्द्यावरही भाष्य केले. काहीही सहन करू शकतो परंतु बेईमानी नाही. काम करण्याची संधी देऊ परंतु जर बेईमानी केली तर कारवाई करू. काहीही करा मात्र बेईमानी आणि जनतेचा अपमान करू नका. मी सोशल मीडियावर हे पाहिलंय. हे सगळं बोलण्याची गरज आहे का? काम करा, आपल्याला मान मिळेल. विरोधी असो वा अधिकारी हा त्यांचा दोष नाही. सिस्टम सुधारली पाहिजे. पंजाबच्या काही मंत्र्यांच्या घरातील लोकांनीही ‘आप’ला मतदान केले. पुढील ५ वर्षात ३ कोटी पंजाबी जनतेचे मन जिंकायचं आहे. पुढील वेळी एकही मत फिरता कामा नये. कुणी भ्रष्टाचार करत असेल तर सांगा असं आवाहनही अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या आमदारांना केले.