सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ते करोडपती आहेत. महत्वाचे म्हणजे, त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या नावावर अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षाही अधिक संपत्ती अथवा मालमत्ता आहे. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पत्नीची एकूण मालमत्ता ४.२३ कोटी रुपये एवढी आहे.
अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांची एकूण संपत्ती १.७३ कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्याकडे ५० हजार रुपये रोख आणि २.९६ लाख रुपये बचत खात्यात आहेत. याशिवाय, त्यांच्याकड १.७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच, आपल्या नावावर कुठलेही घर अथवा गाडी नाही. २०२३-२४ मध्ये आपले एकूण उत्पन्न ७.२१ लाख रुपये होते, अशेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
सुनीता केजरीवाल यांच्याकडे अधिक संपत्ती - अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता या आयआरएस अधिकारी होत्या. त्यांच्याकडे केजरीवाल यांच्या तुलनेत अधिक संपत्ती आहे. सुनीता केजरीवाल यांची एकूण मालमत्ता २.५ कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्याकडे १ कोटी रुपयांपेक्षाही अधिक किमतीची स्थावर मालमत्ता आहे. यात २५ लाख रुपये किमतीचे ३२० ग्रॅम सोन्याचे दागिणे आणि ९० हजार रुपये किमतीची एक किलो चांदी आहे. याशिवाय, त्यांच्याकडे १.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सुनिता यांच्याकडे गुरुग्राममध्ये घर आहेत. तसेच त्यांच्या नावावर पाच सिटर कारही आहे.