नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि नेते आशुतोष यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. आशुतोष यांच्याकडे पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी होती. प्रत्येक प्रवासाचा कुठेतरी शेवट असतो, आपमधील माझे काम आणि सहकाऱ्यांशी संबंध शेवटपर्यंत अतिशय चांगले राहिले आहेत. मात्र, काही वैयक्तिक कारणामुळे मी राजीनामा देत असल्याचे आशुतोष यांनी म्हटले आहे.
आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच आशुतोष यांना राज्यसभेची जाना न मिळाल्यामुळे ते पक्षात समाधानी नव्हते. तर पक्षात त्यांनी घुसमट वाढली होती, त्यामुळेच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, यापूर्वीही अरविंद केजरीवाल यांच्या कारभारावर नाराजी दर्शवत अनेक नेते आपमधून बाहेर पडले आहेत.
आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा स्विकारणार नसल्याचे म्हटले आहे. आशुतोष यांनी ट्विटरवरुन आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यावर, अरविंद केजरीवाल यांनी आशुतोष यांच्या ट्विटला उत्तर देताना, ना, इस जनम मे तो नही.. असे ट्विट केले आहे. तसेच केजरीवाल यांनी दोघांचा एक फोटो शेअर करताना, सर हम सब आपको बहुत प्यार करते है, असेही म्हटले आहे.