AAP Leader of Opposition: नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. निवडणुकीत अरविंद केजरीवाल अन् मनीष सिसोदियांसारखे दिग्गज पराभूत झाले. या पराभवाने 13 वर्षांपासून सत्तेत असलेला आप विरोधी बाकावर आला आहे. दरम्यान, आपकडून माजी मुख्यमंत्री आतिशी यांना विरोधी पक्षनेता करण्यात आले आहे. रविवारी पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
पक्षाचा पराभव झाला पण आतिशी यांनी जागा वाचवलीविधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांसारख्या मोठ्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण कालकाजींपासून आपली जागा वाचवण्यात आतिशी यशस्वी ठरल्या. पक्षातील तगडा महिला चेहरा असल्याने आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. आम आदमी पार्टीने महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासमोर विरोधी पक्षाचा महिला चेहरा म्हणून आतिशी यांची निवड केली आहे.
काय म्हणाल्या आतिशी?विरोधी पक्षनेत्या बनल्यावर अतिशी म्हणाल्या की, दिल्लीच्या जनतेने आम आदमी पार्टीला विरोधाची भूमिका दिली आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. भाजपने दिल्लीतील जनतेला दिलेली आश्वासने आम आदमी पार्टी पूर्ण करून घेईल. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत 2500 रुपये मंजूर होतील, ही मोदीजींची हमी होती पण ती पूर्ण झाली नाही. सीएम रेखा गुप्ता यांच्याकडून 2500 हजार रुपये मिळतील, असे आश्वासन दिल्लीच्या जनतेला देण्यात आले होते. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत, हा आमच्या अजेंड्याच्या शीर्षस्थानी आहे. आप सरकारने केलेली कामे बंद पाडण्याचा प्रयत्न झाला तर दिल्लीच्या हक्कासाठी आम्ही लढू.
24 फेब्रुवारीपासून विधानसभेचे अधिवेशन दिल्लीच्या आठव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन सोमवार 24 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 27 फेब्रुवारीला संपेल. या अधिवेशनात आम आदमी पार्टीच्या मागील सरकारच्या कामगिरीवर कॅगचे 14 प्रलंबित अहवालही सादर केले जाणार आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना सभागृहाला संबोधित करतील आणि कॅगचे 14 अहवाल सादर केले जातील. यानंतर उपराज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल.
27 फेब्रुवारी रोजी उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार 27 फेब्रुवारी रोजी आभारप्रदर्शनावर चर्चा सुरू राहील. त्याच दिवशी उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. भाजपने ज्येष्ठ आमदार विजेंद्र गुप्ता आणि मोहन सिंग बिश्त यांना अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. 24 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री रेखा गुप्ता विजेंद्र गुप्ता यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडणार असून त्याला मनजिंदर सिंग सिरसा पाठिंबा देतील.