मागच्या काही दिवसांपासून आम आदमी पक्ष आणि पक्षातील नेते वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत सापडलेले आहे. एकीकडे आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता आपचे तरुण खासदार राघव चड्डा हे एका ब्रिटिश महिला खासदारासोबत काढलेल्या फोटोमुळे अडचणीत सापडले आहेत.
इंग्लंडमध्ये गेलेल्या राघव चड्डा यांची ब्रिटिश महिला खासदार प्रीत कौर यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळी दोघांनी एक फोटो काढला होता. या फोटोवरून आता भाजपाने राघव चड्डा यांच्यावर टीका केली आहे. ब्रिटनमधील पहिल्या महिला शीख खासदार म्हणून मान मिळवलेल्या प्रीत कौर ह्या खलिस्तान समर्थक नेत्या मानल्या जातात. तसेच भारतीय वंशाच्या असलेल्या प्रीत कौर ह्या भारतविरोधी विचार आणि फुटिरतावादी विचारांसाठी ओळखल्या जातात. कौर यांचा भारतविरोधी आंदोलनाला पाठिंबा असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत असतो.
दरम्यान, भाजपा ने अमित मालवीय यांनी राघव चड्डा आणि प्रीत कौर गिल यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या फोटोच्या माध्यमातून आम आदमी पक्षावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ज्या ब्रिटिश खासदार प्रीत कौर गिल यांच्यासोबतच्या फोटोमुळे राघव चड्डांवर टीका होत आहे त्या ऑल पार्टी पार्लियामेंट्री ग्रुपच्या नेत्या आहेत. भारताचे हस्तक ब्रिटनमध्ये शिखांना लक्ष्य करत अशल्याचा आरोप प्रीत कौर यांनी इंग्लंडच्या संसदेत केला होता. तसेच याआधीही त्यांनी अनेकवेळा भारतविरोधी विधानं केली होती.