Sanjay Singh Latest New:दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लॉड्रिंगप्रकरणी तिहार तुरुंगात कैद असलेले आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांची बुधवारी (3 एप्रिल) सुटका करण्यात आली. सहा महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिंह यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केले. तसेच, ही आनंदोत्सव साजरा करण्याची वेळ नाही. हा संघर्षाचा काळ आहे. आपले ज्येष्ठ नेते तुरुंगात आहेत. लवकरच तुरुंगाचे कुलूप तुटणार आणि सर्व नेत्यांची सुटका होणार, अशी प्रतिक्रिया दिली.
सर्वोच्च न्यायालयाने 6 महिन्यांनंतर 2 एप्रिल रोजी संजय सिंह यांचा जामीन मंजूर केला. मात्र, प्रकृतीच्या समस्येमुळे काल औपचारिकता पूर्ण होऊ शकली नाही. बुधवारी जामीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांची पत्नी अनिता सिंग सकाळी कोर्टात पोहोचल्या आणि दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. सायंकाळी त्यांचा जामीन आदेश तिहार तुरुंगात पोहोचला आणि त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
संजय सिंह तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वीच तिहारच्या बाहेर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आता संजय सिंह आधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार असून, तिथे अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि पक्षातील नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.
ईडीचा जामिनाला विरोध नाहीसुप्रीम कोर्टात 2 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने ईडीला विचारले होते की, संजय सिंह यांना आणखी दिवस तुरुंगात ठेवण्याची गरज आहे का? संजय सिंग यांच्या 6 महिन्यांच्या तुरुंगात असताना त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्यामुळे ईडीनेही त्यांच्या जामीनाला विरोध केला नाही. त्यानंतर आता अखेर त्यांची जामिनावर सुटका झाली.