दिल्लीत पुढचा मुख्यमंत्री कोण असणार याची जोरदार चर्चा आहे. याच दरम्यान, आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेबाबत मोठा दावा केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी खरोखरच मोठं पाऊल उचललं आहे, असं भाजपाचे समर्थकही म्हणत आहेत असं भारद्वाज यांनी सांगितलं.
सौरभ भारद्वाज सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणाच्या नावावर निवडणूक लढविण्याबाबत सांगितलं आहे. एका प्रामाणिक माणसाला जेलमध्ये पाठवलं, त्यांना यामध्ये अडकवण्यात संपूर्ण केंद्र सरकार व्यस्त होतं. त्यामुळे भाजपाविरोधात प्रचंड नाराजी आहे."
"दिल्लीतील प्रत्येकजण निवडणूक कधी होणार असा प्रश्न विचारत आहे. निवडणुका व्हाव्यात आणि केजरीवाल यांची मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी, अशी दिल्लीतील जनतेची इच्छा आहे. केजरीवाल यांना अडकवण्याचा कट पंतप्रधानांनी रचला. मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला आहे."
"देशातील ही पहिलीच निवडणूक असेल ज्यामध्ये एखादा मुख्यमंत्री म्हणत असेल की ही निवडणूक प्रामाणिकपणाच्या नावावर लढवली जाईल आणि तेही जेव्हा केंद्र सरकार, सर्व यंत्रणा, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स असो, सर्व एजन्सी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागल्या असून त्यांची बदनामी करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही."
"भारतीय जनता पक्षाने गेल्या दोन वर्षांत जे काही केलं, तरीही मुख्यमंत्र्यांचा आपल्या जनतेवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास आहे. दिल्लीतील लोक निवडणुका व्हाव्यात म्हणून उत्सुक आहेत आणि ते अरविंद केजरीवाल यांना मतदान करून पुन्हा मुख्यमंत्री बनवतील" असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे.