बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : पंजाबमध्ये प्रचंड विजय मिळविल्यानंतर आम आदमी पार्टी आता हिमाचल प्रदेशवर लक्ष केंद्रीत करत आहे. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही सोबत असणार आहेत. त्यासाठीच केजरीवाल यांनी ६ एप्रिलच्या रोड शोसाठी हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या मंडी या जिल्ह्याची निवड केली आहे.
रोड शोच्या तयारीसाठी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे मंडीमध्ये थांबणार आहेत. मंडी येथे पोहोचल्यानंतर आरोग्यमंत्री जैन यांनी सांगितले की, हिमाचलमधील निवडणुकीसाठी आप सर्व ६८ जागांवर उमेदवार देणार आहे. भाजपा आणि काँग्रेसचे अनेक मोठे नेते संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला. जैन यांच्या उपस्थितीत मंडी येथील अनेक वकील आणि समाजसेवकांनी आपचे सदस्यत्व घेतले. भाजपा आणि काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या काही नेत्यांनी जैन यांच्याशी चर्चा केली आहे.
हिमाचल प्रदेशात डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात मंडी लोकसभेसह तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली आहे. भाजपाचा चारही जागांवर पराभव झाला आहे.
आमदारांनी प्रामाणिकपणे काम करावे : केजरीवाल
आपच्या आमदारांनी लोकांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आमदारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, कोणाच्याही विरोधात अभद्र, आक्षेपार्ह भाषेचा वापर करू नका. सरकारी विभागात २५ हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्री मान यांनी केली आहे. या निर्णयाचे केजरीवाल यांनी कौतुक केले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ‘आप’चे नेते राघव चढ्ढा यांची मोहालीत केजरीवाल यांच्याशी व्हि.सी.व्दारे चर्चा झाली. सर्व आमदारांनी एका टीमच्या स्वरूपात काम करावे, विनम्र राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन ही भ्रष्टाचारविरोधी ॲक्शन लाइन असल्याचेही ते म्हणाले.