लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :दिल्लीतील उत्पादन शुल्क प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थान आणि अन्य ३० ठिकाणी धाडी टाकल्या. सीबीआयच्या या कारवाईने आम आदमी पार्टी आणि केंद्र सरकार यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे.
सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, गतवर्षी स्वीकारलेले उत्पादन शुल्क धोरण आणि त्याची अंमलबजावणी यांच्यातील कथित अनियमिततेप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर सिसोदिया आणि आयएएस अधिकारी आरव गोपी कृष्ण यांच्या ठिकाणांवर आणि अन्य २९ ठिकाणी धाडी टाकल्या.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरवर सिसोदिया यांचे न्यूयॉर्क टाईम्सच्या पहिल्या पानावरील वृत्त शेअर करत म्हटले आहे की, अमेरिकेतील सर्वांत मोठ्या वृत्तपत्राने सिसोदिया यांची दखल घेतली आहे आणि दिल्लीतील शिक्षण मॉडेलचे कौतुक केलेले आहे.
त्यांनी आरोप केला की, केंद्रीय एजन्सीने ‘आप’च्या नेत्यांना त्रस्त करण्यासाठी वरून आदेश दिला आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही. त्यांनी असेही म्हटले आहे की, गतवेळी भारताचे नाव याच वृत्तपत्रात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूमुळे आले होते. कारवाईनंतर सिसोदिया म्हणाले की, सीबीआयचे स्वागत आहे. आम्ही लाखो मुलांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहोत. देशात जो चांगले काम करतो त्याला त्रस्त केले जाते ही दुर्दैवी आहे.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण मद्य व्यावसायिकांच्या परवान्याशी संबंधित आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ मध्ये अंमलबजावणीत कथित अनियमिततेप्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.
उत्पादन शुल्कच्या ११ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. जैन यांना ३० मे रोजी ‘ईडी’ने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केले होते आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्लीचे मुख्य सचिव यांनी जुलैमध्ये दिलेल्या अहवालाच्या आधारावर सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.
चांगल्या कामाचा काहींना त्रास
आपण तपासात पूर्ण सहकार्य करू. जेणेकरून सत्य लवकर समोर येईल. दिल्लीत शिक्षण, आरोग्य क्षेत्रात चांगले काम झाले आहे त्यामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्यामुळे आरोग्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पकडले आहे. मात्र, कोर्टात सत्य समोर येईल. - मनीष सिसोदिया, उपमुख्यमंत्री
त्रास देण्याचा ‘वरून’ आदेश
हाती काहीही लागणार नाही. आम्हाला त्रास देण्यासाठी वरूनच आदेश आहेत. पण विश्वातील शक्ती सोबत आहे. भारताला जगात नंबर एकवर आणण्यासाठी आम्ही ‘मेक इंडिया नंबर वन’ची घोषणा केली आहे. - अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री (वृत्तसंस्था)