दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आरोपी असलेल्या या कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी १७ ऑगस्ट रोजी सीबीआयने गुन्हा नोंदविल्यानंतर ईडीनेदेखील मनी लॉड्रिंगचा गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे. सन २०२१-२२ मध्ये दिल्ली सरकारने जे मद्यासंबंधित उत्पादन शुल्क धोरण निश्चित केले (जे आता रद्द केले) त्या धोरणात सहभागी / लाभार्थी असलेले मद्याचे व्यापारी, वितरक आणि मध्यस्थ यांच्या घर, दुकाने, कार्यालयांवर ही छापेमारी झाली आहे. यात सिसोदिया हेदेखील आरोपी आहेत यानंतर आता दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी थेट मोदींनाच आव्हान दिलं आहे.
मनीष सिसोदिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली माफी मागावी असं म्हटलं आहे. भाजपा स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून मला लक्ष्य करत असल्याचा आरोप केला आहे. सिसोदिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सीबीआयने माझ्या घरावर छापे मारले. त्यांना काही सापडलं नाही. त्यांना तिजोऱ्यांमध्येही काही सापडलं नाही. आता भाजपा स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून मला लक्ष्य करत आहे. सीबीआय आणि ईडीने स्टिंग ऑपरेशनचीही चौकशी करावी."
"माझ्याविरुद्धचे आरोप खरे असतील तर मला सोमवारपर्यंत अटक करावी. नाही तर सोमवारी पंतप्रधान मोदींनी खोटं स्टिंग ऑपरेशन केल्याप्रकरणी माझी माफी मागावी" असं मनीष सिसोदिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. पंजाबमध्येभाजपाने ऑपरेशन लोटस चालवले असून भाजपा आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरपाल सिंग चीमा म्हणाले. अर्थमंत्री चीमा यांनी भाजपा प्रत्येक AAP आमदाराला प्रत्येकी 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे असं म्हटलं आहे.
"भाजपा पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस चालवतंय; आमदारांना 25 कोटींची ऑफर"
आप पंजाबने याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं. "सीरियल किलर भाजपाने आता पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस आणले आहे. पंजाबमधील 'आप'च्या आमदारांना 25-25 कोटींची ऑफर दिली आहे. पण भाजपा हे विसरत आहे की आम आदमी पक्षाचा एकही आमदार विक्रीसाठी नाही. दिल्लीप्रमाणे पंजाबमध्येही भाजपाची कारवाई अपयशी ठरेल" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी मंगळवारी चंदीगड येथे पत्रकार परिषदेत भाजपावर आरोप केला की, 'आप'चे आमदार विकत घेऊन पंजाबमधील 'आप' सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंजाबमधील ऑपरेशन लोटससाठी भाजपा केंद्रीय एजन्सी तसेच पैसा वापरत आहे. अर्थमंत्री चीमा म्हणाले की, भाजपाने आमच्या आमदारांना 'आप'पासून वेगळे होण्यासाठी 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. एवढेच नाही तर भाजपाने या आमदारांना मोठ्या पदाचे आमिषही दिले आहे. यासोबतच तुम्हाला आणखी आमदार मिळाल्यास 75 कोटी रुपये दिले जातील, असे सांगितले.