नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली नायब राज्यपालांच्या निवास्थानी सुरू केलेल्या आंदोलनाला एकीकडे विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असतानाच भारतीय जनता पक्षाने मात्र आपच्या भूमिकेवर खरमरीत टीका केली आहे. आम आदमी पक्ष म्हणजे 'करने मे झीरो, धरने मे हिरो,' अशी खरमरीत टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि अधिकाऱ्यांमधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या असहकाराविरोधात अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांच्या निवास्थानी सुरू केलेल्या आंदोलनाची नायब राज्यपाल यांनी अद्यापही दखल घेतलेली नाही, त्यामुळे वाद अधिकच चिघळला आहे. मात्र पुन्हा एकदा आंदोलनास्त्र उभारणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपा नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी खरमरीत टीका केली आहे. 'आम आदमी पक्ष म्हणजे "करने मे झीरो, धरने मे हिरो'आहे. ''करना कुछ नही धरना सब कुछ"अशी त्यांची मानसिकता आहे,''अशी टीका नक्वी यांनी केली आहे. दिल्लीतील जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास ते धुळीस मिळवत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
आप म्हणजे 'करने मे झीरो, धरने मे हिरो'! भाजपाची खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 11:50 AM