नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांची काेठडी १३ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ३० मे राेजी अटक केली हाेती. त्यानंतर त्यांना ९ जूनपयर्यंत ईडीच्या काेठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले हाेते. काेठडी संपत असल्याने त्यांना गुरुवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी ईडीने त्यांची काेठडी वाढविण्याची मागणी केली हाेती. जैन यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी काेठडी वाढवून देण्याची गरज नसल्याचा दावा केला. त्यानंतर न्या. गीतांजली गोयल यांनी दाेन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून १३ जूनपर्यंत काेठडी वाढविली.
‘त्या’ मुद्देमालाची चाैकशी बाकीअतिरिक्त साॅलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी सांगितले, की दिल्ली आणि गुरुग्राम येथे ईडीने जैन यांच्या ७ ठिकाणांवर छापे मारले हाेते. त्यातून सुमारे २.८२ काेटी राेख व १.८ किलाे साेने जप्त करण्यात आले हाेते. याबाबत जैन यांची चाैकशी करायची असल्याने काेठडी वाढवून मिळावी, अशी मागणी राजू यांनी केली हाेती.