चंडीगड - आम आदमी पक्षाचे एक आमदार, त्यांची पत्नी आणि मुलाला ११ वर्षांपूर्वीच्या एका खटल्यात कोर्टाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पंजाबमधील पतियाळा (ग्रामीण) मतदारसंघाचे आमदार बलबीर सिंह आणि अन्य आरोपींवर एका नातेवाईकावर हल्ला केल्याचा आरोप होता. दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावली असली तरी रूपनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रवी इंदर सिंह यांनी बलबीर सिंह, त्यांची पत्नी रूपिंदर कौर, मुलगा राहुल आणि एका अन्य व्यक्तीला जामीन मंजूर केला आहे.
आपच्या आमदारांविरोधातील हे प्रकरण २०११ मधील आहे. तेव्हा त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या पत्नीची बहीण परमजीत कौर यांच्यात वाद झाला होता. जमिनीवरून हा वाद झाला होता. त्यानंतर बलबीर सिंह यांच्यावर त्यांची मेहुणी आणि साडू यांनी आरोप केले होते. मात्र आमदारांनी हे आरोप फेटाळून लावले होते.
चारही आरोपींना भादंवि कलम ३२३, कमल ३२४ कलम ३२५ आणि कलम ५०६ अन्वये दोषी ठरवून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. परमजीत कौर यांच्या तक्रारीच्या आधारावर रूपनगर जिल्ह्यातील चमकौर साहीब पोलीस ठाण्यामध्ये २०११ मध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टाने आरोपींनी प्रत्येकी १६ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मात्र कोर्टाने सर्व आरोपींना ५० हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, आपण सत्र न्यायालयात अपील करणार असून, या प्रकरणी कायदेशीर लढाई लढणार असल्याचे आमदारांनी सांगितले.
ही घटना १३ जून २०११ रोजी घडली होती. त्यावेळी आमदार बलबीर सिंह यांची मेहुणी परमजीत कौर आणि साडू निवृत्त विंग कमांडर मेवा सिंह यांनी पोलीस ठाण्यामध्ये नोंदवलेल्या आपल्या तक्रारीत सांगितले की, कोर्टाने त्यांच्या जमिनीमध्ये पाणी देण्याची पाळी निश्चित केली होती. मात्र बलबीर सिंह आणि त्यांची पत्नी रूपिंदर कौर, मुलगा राहुल आणि परमिंदर सिंह यांनी मारहाण केली होती. त्यानंतर आमदारांचे साडू आणि मेहुणीने चमकौर साहीब पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, या प्रकरणात दाखल असलेल्या उलट गुन्ह्यातून परमजीत कौर आणि मेवा सिंह यांना मुक्त केले आहे.