बरनाला (पंजाब) : पंजाब विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा पराभव केलेले आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार लाभ सिंग उगोके यांची आई बलदेव कौर सरकारी शाळेत सफाई कामगार म्हणून नोकरी सुरूच ठेवणार आहे. बलदेव कौर म्हणाल्या की, “माझा मुलगा जिंकल्यावर किमान एक दिवस तरी मी कामावर जाणार नाही, असा विचार सगळ्यांनी केला. परंतु, मी स्पष्ट केले की, माझा मुलगा आमदार झाला आहे, मी नाही. मी आजही कंत्राटी सफाई कर्मचारी आहे. मी माझी नोकरी का सोडायची?”
बलदेव कौर म्हणाल्या, “भदौर मतदारसंघातील जनतेला माझ्या मुलाकडून खूप अपेक्षा आहेत. तो आरोग्य, शिक्षण आणि इतर क्षेत्रांत विकासाची सुरुवात करील व चांगले काम करील. लाभ सिंग उगोके यांचे मोबाईल फोन दुरुस्तीचे दुकान आहे. कंत्राटी सफाई कर्मचारी असलेल्या बलदेव कौर या शुक्रवारी नेहमीप्रमाणे झाडू घेऊन कामावर निघाल्या तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. आदल्याच दिवशी त्यांच्या मुलाने चन्नी यांना ३७,५५८ मतांनी पराभूत केले होते. मात्र बलदेव कौर यांच्या दिनचर्येत काहीच बदल झाला नाही. याबद्दल लोक कौतुक करत आहेत.