नवी दिल्ली: दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना आज दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने संजय सिंह यांना १० नोव्हेंबर २०२३पर्यंत पुढील न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी त्यांना ईडीने ४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती.
दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये तीन ठिकाणी संजय सिंह यांच्या नावाचा उल्लेख आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे मद्य धोरण घोटळ्या प्रकरणी तुरुंगात आहेत. मनीष सिसोदिया यांना यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मद्य घोटाळ्यामध्ये मनी लाँड्रिंगचा तपास करत असलेल्या ईडीने त्यांना अटक केली होती. तेव्हापासून सिसोदिया तुरुंगात बंद आहेत.
दरम्यान, २० ऑक्टोबरला दिल्ली उच्च न्यायालयाने संजय सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. संजय सिंह यांना अटक केल्यानंतर ईडीने त्याला न्यायालयात हजर केले. तेथून न्यायालयाने खासदाराला पाच दिवसांच्या ईडी कोठडीवर पाठवले होते. त्यानंतर संजय सिंह यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असताना, दुसरीकडे त्यांच्या निकटवर्तीयांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आले. ईडीने विवेक त्यागी आणि सर्वेश मिश्रा यांना समन्स बजावून त्यांची चौकशी केली.